World Book Day : ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही : डॉ.शाकुरराव कोरडे यांचे प्रतिपादन 

Homeपुणेमहाराष्ट्र

World Book Day : ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही : डॉ.शाकुरराव कोरडे यांचे प्रतिपादन 

Ganesh Kumar Mule Apr 23, 2022 3:43 PM

Annasaheb Waghire College | विद्यार्थ्यांनो झोप उडविणारी स्वप्ने बाळगा |  यशवंत शितोळे
Organic Farming | lभविष्यात सेंद्रिय शेतीच माणसाला तारणार | योगेश मनसुख | अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात उभारला गांडूळ खत प्रकल्प
Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

पुणे : “पुस्तकांशी मैत्री करणे गरजेचे आहे. कारण ती आपल्याला आयुष्यभर साथ देतात. सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीसाठी पुस्तके वाचणे याशिवाय पर्याय नाही. पुस्तकातील अनुभव वाचून माणूस शहाणा होतो. अभ्यासक्रमातील पुस्तकांमधून स्वतःच्या पायावर उभे राहता येते.वाचन संस्कृतीचा आज विकास होणे गरजेचे आहे. तसेच वाचन चळवळीला चालना मिळाली पाहिजे. असे प्रतिपादन डॉ.शाकुरराव कोरडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि- पुणे. येथे जागतिक पुस्तक दिन मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. शाकुरराव कोरडे हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. व्ही. एम.शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात पुस्तक पूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,” पुस्तक म्हणजे सल्लागार व संयमी शिक्षक आहे. पुस्तके प्रत्येकासाठी सखा बनला पाहिजे. पुस्तकांनी कधीच कुणाला फसवलं नाही. पुस्तक सर्वांसाठी जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी सदैव दिव्याप्रमाणे ज्ञान रुपाने केवळ तेवत राहते. झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारी पुस्तकांची दालने जीवनात आनंदाची सप्तरंगी उधळण करतात. म्हणून पुस्तके वाचनाची सवय लावा. पुस्तकांमधून मनोरंजन ,करमणूक व ज्ञान या गोष्टी मिळतात.पुस्तकांखेरीज आजची इतर वाचनाची माध्यमे फक्त खत पाणी म्हणून वापरा.”

महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.निलेश हांडे यांनी महाविद्यालयातील संपन्न अशा ‘श्रीकृष्ण तांबे ग्रंथालय’ या दालनातील पन्नास वर्षाच्या समृद्ध ग्रंथालयाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. “ग्रामीण भागातील एक समृद्ध असे हे आपले ग्रंथालय आहे. आजच्या दिवसासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये ग्रंथ पाहण्यासाठी व पुस्तके जी हवी असतील ती वाचनासाठी घेऊन जाण्यासाठी मुक्त प्रवेश असेल असे जाहीर केले.या ग्रंथालयात आज अखेर एक लाख आठ हजार पुस्तकांचा संग्रह आहे.”असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.शाकुरराव कोरडे सर आपल्या “मानवी जीवनातील पुस्तकांचे महत्त्व”या विषयावरील व्याख्यानात म्हणाले,  धर्मग्रंथ सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार देतात. एक चांगले पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते. चांगले पुस्तक वाचन हे संस्काराचे सर्वात मोठे साधन आहे. माणुसकीचे शिक्षण पुस्तके देतात. वाचनामुळे महाराष्ट्राचा इतिहास घडला.विचारांना दिशा देण्याचे काम पुस्तके करतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,’असाध्य ते साध्य करिता सायास! कारण अभ्यास तुका म्हणे’ आपण पुस्तकांचे वाचन केले तरच आपण वाचू शकू.”


अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्ही. एम. शिंदे म्हणाले,” बहुजन समाज हा पुस्तकांमुळेच पुढे गेला. वारकरी संप्रदायाचे संत साहित्य हे जीवनात मोठे होण्यासाठी गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी वाचनामुळे यशस्वी होतात आणि मोठ्या पदांवर जाऊन पोहोचतात.त्यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तके, संदर्भ,अवांतर साहित्य,ललित साहित्य, अनुवादित साहित्य,इ. पुस्तकांचे वाचन करा.त्यातून आपले विचार प्रगल्भ होतील.पुस्तक वाचन ही फार महत्त्वाची गुरुकिल्ली आहे.”

सदर दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांनी सन-2020 -21 या शैक्षणिक वर्षात पुस्तके लिहिली त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये अनुक्रमे डॉ.निलेश काळे यांचे “भारताचा भूगोल”( प्रशांत पब्लिकेशन, जळगाव), डॉ. मन्सूर मौलवी यांचे
” केमिस्ट्री ऑफ बायो मोलेक्युल्स”( निराली प्रकाशन, पुणे) “न्यू इनोव्हेशन इन केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री( बीपी इंटरनॅशनल प्रकाशन ,लंडन ) डॉ. छाया तांबे यांचे “वानप्रस्थ:शाश्वत जीवनाचा मार्ग “(अविष्कर प्रकाशन, पुणे ), प्रा मनोज देशमुख यांचे “काउंटिंग टेक्निक”- (हिमालया प्रकाशन, दिल्ली), या मान्यवर प्राध्यापक लेखकांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या व प्राचार्यांच्या शुभ हस्ते यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला. 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर यांचा जन्म व मृत्यू हे दोन्ही 23 एप्रिल या दिवशी झाले. एन.एस.एस विद्यार्थी प्रतिनिधी गायकर याने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दासू वैद्य यांच्या ‘पुस्तक’या कवितेचे वाचन याप्रसंगी करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनवणे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय टिळेकर ,डॉ.अमोल बिबे, प्रा.अनिल लोंढे,प्रा.अंबादास आंबवणे, डॉ.रमेश काशीदे,डॉ. भूषण वायकर डॉ.विनायक कुंडलीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.छाया तांबे यांनी केले.आभार प्रा.रोहिणी मदने यांनी मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0