Bhandarkar Oriental Research Institute  | भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

HomeपुणेBreaking News

Bhandarkar Oriental Research Institute | भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Ganesh Kumar Mule Sep 21, 2022 3:59 PM

Pandharpur Aashadhi wari | G 20 summit pune | जी-२० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार आषाढी वारी 
Supriya Sule | कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो
Pune Loksabha Election | कामगारांना रस्त्यावर आणण्याचे‌ काम भाजप सरकारने केले |  कामगार संघटना संयुक्त कृती‌ समितीचा आरोप

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य म्हणजे देशाची ऐतिहासिक सेवा | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर ‘एमओयु’साठी प्रयत्न करू- चंद्रकांत पाटील

पुणे| भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे कार्य केवळ पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे असून ही एक ऐतिहासिक सेवा आहे. भारतीय संस्कृती प्रसाराला समर्पित ही संस्था आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संस्थेचा गौरव केला.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे निर्मित ‘भारत विद्या’ या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे (डिजिटल प्लॅटफॉर्म) श्रीमती सीतारामन यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रदीप रावत, संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैश्यंपायन आदी उपस्थित होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या १०५ वर्षाच्या कार्यापुढे मी अक्षरश: नतमस्तक झाले आहे अशा शब्दात गौरव करुन श्रीमती सितारामन म्हणाल्या, आपली समृद्ध संस्कृती, तत्त्वज्ञान, नीतितत्वे जगासमोर आणण्याचे काम ही संस्था करत आहे. महाभारत, विष्णूपुराणाच्या प्राचीन प्रतींसह अनेक प्राचीन ग्रंथे येथे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. इतर कोणत्याही विद्यापीठाशी, संस्थेच्या कार्याशी या संस्थेच्या कार्याची तुलना करता येणार नाही.

आपला देश समजून घ्यायचा असेल तर आपली अनेक शतकांमधील एकता, तत्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान, कला, संगीत, इतिहास आदी समजून घ्यावे लागतील. त्यासाठी भांडारकर संस्थेचे मोलाचे योगदान राहील. साहित्य, ज्ञानाचा वारसा ही आपली संपत्ती असून भांडारकर सारख्या संस्था त्याद्वारे देशाची सेवा करत आहेत, असेही श्रीमती सीतारामन म्हणाल्या.

संस्थेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर ‘एमओयु’साठी प्रयत्न करू- चंद्रकांत पाटील
भांडारकर प्राच्यविद्या शाखेचे अभ्यासक्रम अधिक व्यापक क्षेत्रात जावेत यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार होण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

श्री. पाटील पुढे म्हणाले, प्राचीन इतिहास समोर आणण्याचे काम संस्थेकडून होते. येथे झालेल प्राच्यविद्यांवरील संशोधनाचे काम सर्वांना डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून अभ्यासासाठी खुले करण्याचा स्तुत्य उपक्रम होत आहे. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत व्हावेत. या धोरणामध्ये बहु विद्याशाखीय अभ्यासक्रमाची रचना होणार असल्याने विद्यार्थी अनेक विषयांमध्ये पारंगत होणार आहे.

भूपाल पटवर्धन म्हणाले, भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती परकीय अभ्यासकांनी त्यांच्या दृष्टीकोनातून जगासमोर मांडला. परंतु, आपल्या संस्कृतीकडे आपल्या स्वत:च्या दृष्टीकोनातून पाहण्याची आणि सर्वांसमोर मांडण्याची गरज लक्षात आली असून भांडारकर प्राच्यविद्या संस्था हे काम समर्थपणे करत आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा या ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून खुला करण्यात येत आहे.

यावेळी श्री. रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार ॲड. सदानंद फडके यांनी मानले.