राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुनर्स्थापित करावा
: गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्त गडकरी प्रेमींची मागणी
पुणे : आपल्या अवघ्या 34 वर्षांच्या अल्पायुष्यात राम गणेश गडकरी यांनी विपूल आणि सकस साहित्यकृती निर्माण करुन मराठी साहित्य विश्वात मोलाची भर घातलेली आहे. अशा दिग्गज साहित्यीकाच्या वाट्याला मरोणोत्तर अशी अवहेलना येणे हे खेदजनक असून राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी, अशी मागणी राम गडकरी प्रेमींनी आज केली.
राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे बालगंधर्व रंगमंदिर परिसरात गडकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांच्या साहित्यीक योगदानाला उजाळा देण्यात आला, त्यावेळी जमलेल्या गडकरी प्रेमिंनी ही मागणी केली. यावेळी प्रसिद्ध वक्ते आणि लेखक श्याम भुर्के अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनिल महाजन, उदय लागू, श्रीराम रानडे आणि नाट्य व्यवस्थापक प्रविण बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्याम भुर्के यावेळी म्हणाले की, राम गणेश गडकरी यांनी सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनीत कामास प्रारंभ केला. तिथूनच त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली. त्यांनी पाच अक्षरी पाच नाटके लिहिली. त्यातील प्रेमसंन्यास हे नाटक अजरामर झाले. तसेच एकच प्याला या नाटकाचा संदर्भ आजही लागू पडतो. त्यानंतरची त्यांनी लिहिलेली भावबंध आणि पुण्यप्रभाव ही नाटके देखील रसिकांनी उचलून धरली. त्यांनी लिहायला घेतलेले राजसन्यास हे नाटक मात्र त्यांच्या तब्यंतीच्या तक्रारीमुळे ते पूर्ण करु शकले नाही. ते केवळ 67 पानांपर्यंतच लिहू शकले. हे नाटक आता 180 पानांचे असून त्यात कालांतराने तत्कालीन साहित्यीकांनी त्यांच्या परीने भर घालून त्या नाटकाची संहितापूर्ण केली. अच्युतराव कोल्हटकरांनी यांनी, ‘मी मुंबईचा गव्हर्नर झालो तर हे राजसंन्यास नाटक पाठ्यपुस्तकात समिविष्ट करेल’ इतपर्यंत शब्द दिला होता. बालशिवाजींना पाळण्यात घालून पाच देवता त्यांना जोजावत आहेत, हा प्रसंग उभा राहील अशी नांदी गडकरींनी लिहिली. राजा हा जगाचा उपभोग शून्य स्वामी आहे, हे गडकरी यांच्या नाटकातील वाक्य तर आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडते. गडकरी यांनी बाळकराम नावाने विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या नावाने काव्य लेखन केले. नाट्य, कविता आणि विनोदी साहित्यनिर्मीत करणा-या गडकरींच्या नशिबी आलेली ही अवहेलना निषेधार्ह अाहे.
यावेळी बोलतांनी सुनिल महाजन म्हणाले की, गडकरींचा पुतळा पुनर्स्थापीत करावा, ही मागणी घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गांभिर्याने पत्रव्यवहार सुरु आहे. तसेच महापाैर मुरलीधर मोहोळ यांना देखील लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी हे आम्हा नाट्यक्षेत्राशी संबंधीत मंडळींकरीता आराध्य दैवत आहे. त्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करुन झालेली चूक सुधारावी.
उदय लागू म्हणाले की, गडकरींच्या पुतळ्याबाबत झालले राजकारण हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. कलाकार हा कलाकार असतो त्याने कोणती भूमिका स्विकारावी आणि मूळ विचारधारा काय ठेवावी याबाबत त्याला स्वातंत्र्य असावे अशी भूमिका आत्ता काही भूमिकांवरुन उठलेल्या वादाच्या पार्श्वभुमिवर घेतली जाते. तर गडकरींनी असे काय वादग्रस्त लिहिले आहे की त्यांचा पुतळा उखडून टाकावा. गडकरी हे आम्हां नाट्यकर्मीं करता आराध्य दैवत आहेत. पुढच्या पिढी पर्यंत गडकरी आणि
त्यांच्या साहित्यकृती पोहचवायच्या असतील तर पुतळ्याची पुनर्स्थापना करुन त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे.
श्रीराम रानडे म्हणाले की, राम गणेश गडकरी यांच्या नाटकांचा अभ्यास केल्याशिवा. आणि परिमर्श घेतल्याशिवाय मराठी नाट्यविश्वाचे वर्तुळ पुर्ण होणार नाही. गडकरी यांनी त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर लिहिलेल्या नाटकांचे संदर्भ आजही लागू पडतात, यातच गडकरींचे द्रष्टेपण दिसूनयेते. गडकरींची साहित्य निर्मीतीची भाषा ही आजच्या तरुणांनी वाचली पाहिजे आणि पचवली देखील पाहिजे.
COMMENTS