आता रविवारी देखील पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लस
: महापालिका करणार नियोजन
पुणे – शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे (Old People) बुस्टर डोसचे (Booster Dose) लसीकरण (Vaccination) वेगात करण्यासाठी आता रविवारी देखील महापालिकेची (Municipal) लसीकरणकेंद्र सुरू राहणार आहेत. पुढच्या रविवारी म्हणजे ३० जानेवारीपासून कोणते केंद्र सुरू राहतील याचे नियोजन लवकरच पुणे महापलिकेतर्फे जाहीर केले जाणार आहे.पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये महापालिकेने शहरातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. त्यावेळी लसीकरणाची माहिती घेताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीही रविवारी लसीकरण सुरू ठेवा असे आदेश दिले आहेत.
: पालकमंत्री यांचे आदेश
पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, वद्धापकाळात इतर आजारांनी त्यांना ग्रासलेले असते, रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. त्यामुळे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण वेगात होणे गरजेचे आहे.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत शहरातील ४ लाख ८७ हजार ८८५ ज्येष्ठांनी एक डोस घेतला आहे. तर ४ लाख २८ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १० जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत १७ हजार ३८९ ज्येष्ठांनी बुस्टर डोस घेतला आहे. महापालिकेला येत्या काळात आणखी किमान चार लाख ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस द्यायचा असल्याने या मोहिमेची गती वाढवली जाणार आहे.महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शहरातील कोणते केंद्र सुरू राहणार आहेत याचे नियोजन जाहीर केले जाईल. सध्या सोमवार ते शनिवार लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये कोव्हीशील्डचे १८० व कोव्हॅक्सीनचेही लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्रांची संख्या निश्चीत केली जाते.
COMMENTS