महापालिका सेवकांच्या वेतन प्रणालीत होणार सुधारणा!
| पे रोल, शिक्षण विभाग व सेवानिवृत्त सेवकांना एकत्रितपणे जोडणार
पुणे | महापालिका सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणालीमध्ये (Pay Roll and Pension Software) सुधारणा करून त्याचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. पे रोल वरील सेवक, सेवानिवृत्त सेवक आणि शिक्षण विभागाकडील सेवक अशा सर्वांना एकत्रितपणे जोडले जाणार आहे. याचा चांगला फायदा सेवानिवृत्त सेवकांना (Retired Employee) होणार आहे. त्यांची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत आणि त्यांना लवकरात लवकर पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे. लवकरच याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. आगामी 3 महिन्यात याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महापालिका सेवकांच्या वेतनासाठी महापालिकेकडून सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणाली (pay Roll and pension software) वापरली जाते. मात्र यात बऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण होताना दिसताहेत. कारण ही प्रणाली आता जुनी झाली आहे. त्याचे आधुनिकीकरण आवश्यक असते. जेणेकरून प्रणालीत सुटसुटीतपणा येईल आणि वेतन करण्यात गतिमानता येईल. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याबाबत आगामी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. यासाठी 80-90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
महापालिका सेवक वेतन व सेवानिवृत्त सेवक वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण ही प्रणाली जुनी झाली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली आहे. पे रोल वरील सेवक आणि सेवानिवृत्त सेवक अशा दोघांना याचा फायदा होणार आहे. यामुळे वेतन बाबतच्या कामात गतिमानता येणार आहे. याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल.
– राहूल जगताप, विभाग प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग.