मध्यवर्ती पेठांतील रस्ते किमान तीन वर्षे सुस्थितीत राहतील
: स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची ग्वाही
पुणे : मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते आधी दिलेल्या मुदतीत म्हणजेच २० जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील आणि पुढील तीन वर्षे ते सुस्थितीत राहून कोणत्याही प्रकारची खोदाई करावी लागणार नाही अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांनी दिली.
सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत १३ नोव्हेंबरला या भागातील समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. प्रभागातील समस्या लक्षात घेऊन प्रभागाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, क्षेत्रिय अधिकारी आशिष महादलकर, पथ विभागाचे देडगे, पाटील, अर्धापुरे, ड्रेनेज विभागाचे फड, उमेश गोडगे, गांगुर्डे यांच्या सह स्मार्टसिटी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकी नंतर रासने पत्रकारांशी बोलत होते.
मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणार्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.
रासने पुढे म्हणाले, विविध विकासकामांसाठी रस्ते खोदाईची बहुसंख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची (ट्रॅफिक सिग्नल) या परिसरातील २४ कामे नव्याने सुरू झाली आहेत. ती १० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसांत रस्ते पूर्ववत होतील. पुढील काळात रस्त्यांवर वाहतुक सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या साठी आवश्यक निधीची तरतुद करण्यात आली आहे.
रासने म्हणाले, महात्मा फुले मंडईसमोरील मेट्रोचे काम, दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे, शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे, हिराबाग चौकातील वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती २० जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.
*हिराबाग चौक ते स्वारगेट ठरणार अपवाद*
रासने म्हणाले, हिराबाग चौक ते स्वारगेट या रस्त्यावर समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० जानेवारी पर्यंतची मुदत खात्याने मागितली. त्यामुळे टिळक रस्त्यावरील हिराबाग ते स्वारगेट हा अपवाद वगळता सर्व विकासकामे २० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील.
*२६ जानेवारीला पादचारी दिन*
येत्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. या वेळेला लक्ष्मी रस्ता समाधान चौक, उंबऱ्या मारुती चौक, टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार, नगरकर तालीम असा पादचारी मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे, असेही रासने यांनी सांगितले.
COMMENTS