नेहरू स्टेडियम मधील पीच आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार!
: महापालिका क्रीडा विभागाची नियमावली तयार
पुणे : पुण्यातील पंडित नेहरू स्टेडियम ( pandit Nehru Stedium, pune) आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून ओळखले जाते. इथे क्रिकेट मध्ये चांगले खेळाडू तयार करण्यासाठी महापालिकेने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र इथे काही लोकांची मक्तेदारी झाली आहे. वर्षानुवर्षे त्याच संघटना आणि प्रशिक्षक इथे पीच (Pitch) बळकावून बसले आहेत. ही प्रथा आता महापालिका मोडीत काढणार आहे. इथला दर्जा टिकावा आणि चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी महापालिका आता ऑनलाईन पद्धतीने पीच उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठीची नियमावली महापालिका क्रीडा विभागाने तयार केली आहे.
: शास्त्रीय पद्धतीने पीच विकसित करणार
महापालिकेने विकसित केलेल्या पंडित नेहरू स्टेडियम मध्ये सद्यस्थितीत 11 पीच आहेत. यातील काही पीच राज्याच्या संघटनेला तर काही खाजगी प्रशिक्षकांना चालवण्यास दिले आहेत. मात्र सध्यातरी महापालिकेकडे याचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे हा गोंधळ कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने एक नियमावली तयार करून अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठवली आहे. त्यानुसार आता स्टेडियम मधील 11 पीच शास्त्रीय पद्धतीने विकसित केले जातील. हे काम देखील मान्यताप्राप्त आणि त्यात अधिकार असणाऱ्या ठेकेदाराला देण्यात येईल. हे पीच विकसित झाल्यांनतर आताच्या पद्धती ऐवजी ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील. हे पीच फक्त प्रशिक्षकांनाच दिले जातील. हे प्रशिक्षक देखील रणजी सामने खेळलेले अथवा क्रिकेटची चांगली जाण असणारे हवेत, अशीच अट ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ते ही या निमित्ताने कमी होईल आणि माहापालिकेला उत्पन्न मिळेल. शिवाय चांगले खेळाडू देखील तयार होतील. लवकरच या नियमावलीवर अंमल केला जाईल. अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
COMMENTS