महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत
: सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला टोला
पुणे : पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची (भाजप) मते फुटतील हा महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षाने केलेला दावा खोटा ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना या तीनही पक्षाचा मुखवटा गळाला आहे, अशी प्रतिक्रिया महनगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. एकसंघ पद्धतीने भाजप या निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता, असे बिडकर यांनी स्पष्ट केले. तर केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.
१४ जागांवर भाजप विजयी
पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडी) सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. या निवडणुकीत भाजपने उभे केलेले सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. २२ पैकी १४ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर सभागृह नेते बिडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. योग्य पद्धतीने केलेले नियोजन यामुळे या निवडणुकीत भाजपची सर्व मते ‘इनकॅश’ झाली. त्यामुळे भाजपची मते फुटतील हा विरोधी पक्षाने केलेला दावा फोल ठरला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी पुणेकरांच्या लक्षात आली. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या एका पक्षाच्या उमेदवाराला तर आवश्यक असलेला मतांचा कोटा देखील पूर्ण करता आला नाही. भाजपची मते फोडण्याच्या वल्गना ते करत राहिले. मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.
COMMENTS