ताब्यात घेतलेल्या जागा महापालिका सरकारी कार्यालयांना भाडे तत्वावर देणार
: मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचा निर्णय
पुणे : महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील व्यवसायिकांना भाडे तत्वावर मिळकती दिल्या जातात. मात्र व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने अशा लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्याकडून मिळकत ताब्यात घेतली जात आहे. अशा ताब्यात घेतलेल्या मिळकती आता सरकारी कार्यालयांना भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यानुसार महापालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
: जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु
महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार पणे सुरु आहे. सोबतच आता मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. विभागाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. विभागाने महापालिका मिळकत वाटप नियमावली नुसार जागा आणि गाळे भाडे तत्वावर दिले आहेत. मात्र याचे नाममात्र भाडे असताना देखील संबंधित गाळे धारक महापालिकेचे शुल्क अदा करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे विभागाकडून या लोकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही या लोकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार बऱ्याच जागा ताब्यात देखील घेण्यात आल्या आहेत. आता या जागा सरकारी कार्यालयांना चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यानुसार महापालिकेने पत्रव्यवहार देखील सुरु केला आहे.
: अडीच कोटी पेक्षा अधिक वसुली
मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून वसुली देखील करण्यात येत आहे. वसूली न देणाऱ्या व्यावसायिकाकडून जागा ताब्यात घेतली जात आहे. मागील आठवड्यात जवळपास अडीच कोटी पेक्षा अधिक वसुली करण्यात आली आहे. यामध्ये आयसीसी टॉवर कडून 1 कोटी 85 लाख, पीएमआरडीए कडून 12 लाख 89 हजार, पाषाण तलाव 5 लाख 65 हजार 500, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी 15 लाख 50 हजार आणि श्री गणेश इंटरप्रायजेस (सीएनजी पंप) 39 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. अशी माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.
COMMENTS