पाककलेचा समृद्ध वारसा संक्रमित करण्याची गरज
: शेफ विष्णू मनोहर
पुणे : भारतीय पाककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.
पाककलेमध्ये निपुण आणि अनुभवी अनुराधा तांबोळकर यांनी लिहिलेल्या आणि ‘नंदिनी प्रकाशन’च्या ‘आज काय मेन्यू?’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मनोहर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लेखिका अनुराधा तांबोळकर, पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, डॉ. संपदा तांबोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोहर म्हणाले, शिक्षण आणि करिअरमुळे तरुण मंडळींचे पाककलेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना पाककलेमध्ये रस आहे, पण छोट्या छोट्या टीप्स माहीत नसल्यामुळे स्वयंपाक करणे कंटाळवाणे होते. त्यांच्यासाठी आज काय मेन्यू? उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
काळे म्हणाल्या, महिलांनी सुंदर दिसण्याबरोबर पोट ही भरले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. रोज स्वयंपाकात काय करायचे? हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले पारंपरिक पदार्थ चांगलेच आहेत. आंबोळी, थालीपीठ, मेतकूट असे विस्मृतीत गेलेले पदार्थ पुढे येणे आवश्यक वाटते. डॉ. तांबोळकर आणि सरपोतदार यांनी मनोगत व्यक्त केले.
कांचन तांबोळकर यांनी स्वागत, अनुराधा तांबोळकर यांनी प्रास्ताविक, वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन आणि इशा तांबोळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
COMMENTS