The Karbhari News Impact | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती | सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आयुक्तांचे आदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत महापालिका आयुक्तांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. अनुभवाच्या अटीबाबत सविस्तर अभ्यास करून सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता दुरुस्ती झाल्यानंतर ही पदोन्नती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान या बाबतचे वृत्त “The Karbhari” वृत्तसंस्थेने काल प्रसारित केले होते. (PMC Zonal Medical Officer Promotion)
पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट आहे. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान या पदासाठी आज (४ नोव्हेंबर) बढती समितीची बैठक झाली. (Pune Municipal Corporation Health Department)
या बैठकीत आलेल्या तक्रारीवर म्हणजे अनुभवाच्या अटीवर चर्चा झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी यावर सविस्तर अभ्यास करून आणि गरज भासल्यास सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता ही प्रक्रिया लांबली असली तरी नियमाने होणार आहे, असे मानले जात आहे.
—
परिमंडळ आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदासाठी नेमणुकीची अर्हता व नेमणुकीची पद्धत १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.B.B.S पदवी. २) मनपा आस्थापनेवर कार्यरत असणान्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदांच्या कामाचा ८ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यामधून सेवाज्येष्ठतेने अशी आहे.
| सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांचा अजून एक आक्षेप
दरम्यान अनुभव अटीवर आक्षेप घेतल्या नंतर सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी अजून एक आक्षेप घेतला आहे. त्यानुसार अलीकडील शासननिर्णयानुसार केवळ एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय अनुभवाच्या आधारे सहाय्यक आरोग्य अधिकारी (AMOH) म्हणून पदोन्नती देण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा निर्णय विद्यमान नियम, शैक्षणिक पात्रता आणि प्रशासनिक न्यायाच्या तत्वांना विरोधात असून, तो तात्काळ पुनर्विचार करण्याची मागणी सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी केली आहे.
१. निश्चित शैक्षणिक पात्रतेचा भंग
राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध शासन निर्णय/ नियमांनुसार व पूर्वीच्या शासननिर्णयांनुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी (AMOH) या पदासाठी एमबीबीएस (MBBS) + सार्वजनिक आरोग्य पदविका (DPH) किंवा तत्सम पदव्युत्तर पदवी पात्रता अनिवार्य आहे. फक्त एमबीबीएस पदवीच्या आधारे पदोन्नती देणे म्हणजे ऑगस्ट २०१४ च्या Recruitment Rule मधील सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदासाठी असलेल्या शैक्षणिक अर्हतेचा भंग आहे. सहाय्यक आरोग अधिकारी या पदासाठी – अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शाखेची पदवी (MBBS) आ) प्रतिबंधक आणि सामाजिक औषध शास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका (DPH) अशी आहे.
२. सार्वजनिक आरोग्य शिक्षणाचा उद्देश दुर्लक्षित
डीपीएच (DPH) पदविका ही सार्वजनिक आरोग्याचे प्रशिक्षण, महामारीशास्त्र, सांख्यिकी, आरोग्य धोरण, स्वच्छता, संसर्गजन्य आजार नियंत्रण आणि महानगरपालिका आरोग्य कायदे यामध्ये तज्ज्ञता निर्माण करण्यासाठी आहे. ही पदवी नसलेल्या अधिकाऱ्यांना पदांवर नेमल्यास या पदाचे मूलभूत उद्दिष्टच नष्ट होते आणि तांत्रिकदृष्ट्या अक्षम सहाय्यक आरोग्य अधिकारी, उप- आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी या पदांवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील सर्व बाबींचा विचार करून केवळ एमबीबीएस पदवीवर आधारित सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग- १) यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावावर निर्णय होणेपुर्वी आम्ही उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत चर्चा करण्यात येऊन आमच्यावर अन्याय होणार नाही, याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा व सदर शासन निर्णयातून सहाय्यक आरोग्य अधिकारी हे शब्द वगळण्यात यावे. असे म्हटले आहे.

COMMENTS