प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली
| आतापर्यंत 3248 किलो प्लास्टिक बॉटल जमा
पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तीन हजार २४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा झाल्या आहेत. यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय आघाडीवर आहे. दरम्यान, स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे. अशी माहिती उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची घोषणा केली होती. कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक बाइक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. ही स्पर्धा २८ फेब्रुवारीपर्यंत होती, मात्र नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढविली आहे.
दरम्यान महापालिका अधिकृत केलेल्या रिसायक्लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्स, इंटरलॉकिंग ब्लॉक्स इ. साहित्य बनवून त्याचा वापर शहर सौंदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या सुशोभीकरणासाठी करणार येणार आहे.