मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक
| कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती
पुणे :- पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणेच 8.33% बोनस व सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर विविध आंदोलने करण्यात आली. त्याचे दखल घेऊन आज पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली आहे.
सुनील शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार या बैठकीमध्ये कंत्राटी कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सारखेच काम करत असून कायम कामगारांना मात्र 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. कंत्राटी कामगारांना मात्र काहीही देण्यात आलेले नाही. हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ही बाजू कामगार नेते सुनील शिंदे यांनी यावेळी मांडली ते पुढे म्हणाले कंत्राटी कामगार कायदा अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार या सर्व कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांन प्रमाणे बोनस व सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉ खेमनार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. सदर बाबींचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव स्थायी समिती व मुख्य सभेपुढे मांडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, मुख्य लेखापाल उल्का कळस्कर, विधी सल्लागार हे उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, एस के पळसे, सिताराम चव्हाण, विजय पांडव, उज्वल साने, जानवी दिघे, संदीप पाटोळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.