चांदणी चौक वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी गतीने कार्यवाही
पुणे | चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून सध्या अस्तित्वात असलेला जुना पूल पाडून नवीन चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अस्तित्वातील ओव्हरपासवरील सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
पुणे शहरातील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून निघालेल्या निष्कर्षानुसार येत्या १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान अस्तित्वातील जुना अरुंद पुल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्याचे ठरले आहे. आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगरपालिका, संरक्षण विभाग व अन्य विभागांमार्फत अस्तित्वातील ओव्हरपास वरील पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी आदी सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठीचे काम सुरु झालेले आहे.
सुरू असलेल्या कामानुसार सध्या नविन पूलाच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूच्या अबटमेंटच्या खोदकामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या वेद भवन समोरील अस्तित्वात असलेल्या सेवा रस्त्याच्या भरावाचे काम सुरु करण्यात आले आहे. महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
श्रृंगेरी मठासमोरील सेवा रस्त्यावरील राडारोडा उचलून रस्ता वाहतूकीस खुला करण्यासाठीचे काम प्रगतीत आहे. पुढील आठवड्यात सेवा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल. मुळशी ते सातारा रॅम्पचे काम प्रगतीत असून पुढील सात दिवसात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागामार्फत आवश्यकतेनुसार वाहतूक मार्शलची नेमणूक करण्यात येत आहे, असेही श्री. कदम यांनी कळवले आहे.