Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते दि.२ डिसेंबर रोजी उदघाटन
Mohan Joshi Congress – (The Karbhari News Service) – काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह दिनांक २ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते दिनांक २ डिसेंबर रोजी एस.एम.जोशी सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता उदघाटन होईल, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. (Harshwardhan Sapkal Congress)
आदरणीय श्रीमती सोनियाजींनी पंतप्रधान पदाचा त्याग करून भारतीय लोकशाहीत आपला वेगळा ठसा उमटवला. या निमित्ताने २००४पासून सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह आयोजित केला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवलेल्या कष्टकरी पालक आणि पाल्य यांचा फिनिक्स पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. तसेच आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण, रोजगार मेळावा या विषयांवरील भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.
त्यामध्ये मेगा आरोग्य शिबीर, नित्योपयोगी वस्तू वाटप, अन्नदान, दिव्यांगांना साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिक गरीब योजना कार्डाचे वितरण, ५०० मुलींना सुकन्या समृद्धी कार्डाचे वाटप, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, दोन दिवसीय भव्य रोजगार मेळावा, ग्रंथ जागृती कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, महिला बचतगट मेळावा आणि मार्गदर्शन अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ‘सोनिया नारी शक्ती पुरस्कारा’चे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धा आयोजित केली असून त्यात ३२ संघ सहभागी होणार आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी ‘व्होट चोरी’चे सादरीकरण केले होते, त्यावर आधारित माहितीपर प्रदर्शन उपक्रम राबविला जाणार आहे. मल्टिमीडियाच्या आधारे मतदार याद्यातील फेरफार, संशयास्पद मतदार डेटा यातील राहुल गांधी यांनी मांडलेल्या तथ्यांचे सादरीकरण करण्यात येईल. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची ‘भारतीय संविधान’ विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य, आजचे संवैधानिक धोके, लोकशाहीवर ओढवलेले संकट असे विषय व्याख्यानात मांडले जातील.
सप्ताहातील कार्यक्रमांना माजी मुख्य मंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराजजी चव्हाण, ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी यांनी दिली.

COMMENTS