Shivchhatrapati Krida Purskar  | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण | शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

HomeBreaking News

Shivchhatrapati Krida Purskar  | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण | शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

Ganesh Kumar Mule Apr 18, 2025 7:20 PM

Regional Agricultural Extension Management Training Institute : महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देणार 
Bhoomipujan tomorrow by the hands of both the deputy chief ministers of the PMC multispeciality hospital to be built in Warje!
Ladki Bahin Yojana Maharashtra | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

Shivchhatrapati Krida Purskar  | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण | शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

 

Maharashtra News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Pune News)

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२- २३ व २०२३-२४ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सन २०२२- २३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना वितरित करण्यात आला.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू शकुंतला खटावकर आणि प्रदीप गंधे यांचे विशेष अभिनंदन करतानाच सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

खेळांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवित याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खुल्या जागांची मोठी कमतरता आहे तिथे शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक मैदाने आणि क्रीडा क्लब यांच्यासोबत सहयोग करू शकतात, असेही राज्यपाल म्हणाले. आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात क्रीडा संकुले स्थापन करण्यात आली असून क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे, असेही श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा, ‘विकसित भारत’ बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे. आपले खेळाडू त्यात यशस्वी होतील असा आशावादही राज्यपालांनी व्यक्त केला.

पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे- मुख्यमंत्री

शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राजमान्यता आहे. हा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, भूतपूर्व खेळाडू आदी सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण योगदान देऊ अशा प्रकारची मानसिकता बाळगावी. छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे; आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांनी अनेक बॅडमिंटन खेळाडू घडविले. त्यांनी महाराष्ट्रात बॅडमिंटनची संस्कृती निर्माण करण्याचे काम केले. आज खेळांना समाज मान्यता आणि राजमान्यताही आहे, मात्र १९७९ ते ८२ साली महिला कबड्डीपटू म्हणून शकुंतला खटावकर राष्ट्रीय स्तरावरील १०६ सामने खेळून अनेक विजय मिळवून दिले ही कामगिरी अतिशय अतुलनीय आहे, अशा शब्दात जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे कौतुक मुख्यमंत्री यांनी केले. आपण पदकांची भरारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. तथापि, आपल्या आता राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदके मिळविण्याची गरज आहे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चांगले खेळाडू असल्यास त्यांना आवश्यकता असल्यास परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय मागील काळात घेतला आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात सर्व सुसज्ज व्यवस्थेसोबत गेल्याशिवाय खेळाडूंना चांगल्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही हे लक्षात घेऊन खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ (भौतिकोपचार तज्ज्ञ) यांना बरोबर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येते.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकून येणाऱ्या खेळाडूंचा उचित सन्मान झाला पाहिजे यासाठी बक्षिसांच्या रक्कमेत भरीव वाढ केली आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी नोकऱ्यांमध्ये दालने उभी केली असून थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रमदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तालुक्यांपर्यंत चांगल्या खेळाच्या पायाभूत सुविधा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांच्या खेळावरील प्रेम, मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. बॅडमिंटन पटू व उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडविणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे व कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ही आनंदाची बाब आहे. जीवन गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदा महिला प्रशिक्षकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगून त्यांनी यापुढे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्या-त्या वर्षीच वितरित करण्यात यावेत, अशा सूचना क्रीडा विभागाला दिल्या.

ते म्हणाले, क्रीडा विभागाला पुरवणी मागण्यांमध्ये निश्चितच निधी वाढवून देण्यात येईल. पुरस्कारार्थींनी पुढील खेळाडू घडविण्याचे काम करावे, महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राज्य शासन पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी स्वागत करताना मंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्य शासनाने खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी मानले आहे. शासकीय नोकरीत ५ टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येते. आतापर्यंत १२८ खेळाडूंना शासनाने थेट नोकरी दिली आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमच योग क्रीडा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, थेट पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, साहसी क्रीडा पुरस्कार असे सन २०२२- २३ चे ७० आणि सन २०२३-२४ च्या ८९ याप्रमाणे एकूण १५९ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारंभास पुरस्कारार्थी खेळाडू, खेळाडूंचे पालक आदी उपस्थित होते.