Shivajinagar Bus Station | शिवाजीनगर एसटी स्थानकाचा कोणासाठी केला भाजपने खेळ खंडोबा | माजी आमदार मोहन जोशी
Pune News – (The Karbhari News Service) – एसटी प्रवाशांसाठी सोयीचे असलेले शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांनंतरही बांधले जात नाही. भाजप कोणासाठी प्रवाशांची ही सोय अडवून ठेवून, खेळ खंडोबा करत आहे आहे? असा सवाल माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. (Mohan Joshi Pune Congress)
मेट्रो रेल्वेसाठी जुने शिवाजीनगर एसटी स्थानक सहा वर्षांपूर्वी पाडले आणि ते पुणे -मुंबई रस्त्यावरील वाकडे वाडी येथे स्थलांतरित करण्यात आले. वाहतुकीसाठी ही जागा अतिशय धोकादायक आहेच तसेच ती प्रवाशांसाठीही खूपच गैरसोयाची आहे. पण, एसटीसाठी नवीन स्थानक मूळ जागीच पुन्हा लवकरच उभे राहील, या आशेवर प्रवाशांनी धीर धरला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आश्वासने दिली की, मूळ जागी तातडीने हे स्थानक उभारू. मात्र, ते आश्वासन गुंडाळले जावून आता त्याजागी खाजगी व्यावसायिकामार्फत एसटी स्थानकाबरोबरच व्यावसायिक संकुलही उभे करण्याचा खटाटोप भाजपकडून चालू आहे.यात कोणाचेतरी हितसंबंध आहेतच. शिवाय व्यावसायिक संकुल बांधताना हा प्रकल्पही लांबणीवर पडेल.* या प्रकाराला काँग्रेस पक्षाचा विरोध राहील, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मूळ जागी स्थानक लवकर उभे करावे, अशी मागणी करण्यात आली आणि मेट्रो कंपनी आणि परिवहन खाते यांच्यातील करारानुसार एसटी स्थानक उभारण्याचे काम मेट्रो कंपनी करणार आहे, त्यादृष्टीने दोन्ही कंपन्यांमध्ये समन्वय साधला जावा , हे ही तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच फोनवर परिवहन मंत्री आणि मेट्रो च्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. दरम्यान, *मेट्रो ऐवजी ९८ वर्षाच्या कराराने खाजगी व्यावसायिकाकडून व्यापारी संकुल उभे करण्याचा प्रस्ताव भाजपने तयार करवून घेतला,* असे खात्रीलायक समजले, हा सगळा खटाटोप आणि खेळ खंडोबा कोणासाठी चालला आहे? असा प्रश्न मनात येतो, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
.*पुणे शहरातील भाजपचे सर्व मंत्री, आमदार यांना आम्ही ताजमहाल उभा करायला सांगत नाही आहोत,* एसटी स्थानक उभा करायचा आहे. ते ही त्यांना जमत नाहीये. याचा अर्थ त्यांना पुणेकरांच्या सुख सोयींशी काही देणेघेणे नाही. फक्त निवडणुका जिंकणे, एवढाच त्यांचा अजेंडा आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एसटी स्थानक हा विषय मार्गी लागावा म्हणून काँग्रेस पक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, निवेदने, आंदोलने अशा विविध मार्गांनी पाठपुरावा करत आहे आणि करत राहील, असे मोहन जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

COMMENTS