Shivajinagar ST Stand |काँग्रेसच्या आंदोलनाने शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी | माजी आमदार मोहन जोशी
Shivajinagar ST Stand |पुणे – काँग्रेस पक्षाने (Pune Congress) आंदोलनाचा दणका दिल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक (Shivajinagar ST Stand) पूर्ववत जागी आणि महामेट्रोच्या (Mahametro) खर्चात बांधण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी दिली आहे.
प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी होण्यासाठी १५ दिवसांत निर्णय घेतला जावा, अशा मागणीसाठी माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते. हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मुख्य मंत्र्यांनाच पुण्यात अडवू, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला होता.
महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले होते. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी एसटी स्थानक पूर्ववत करण्याबाबत निर्णय होत नव्हता. एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर झाला होता. परिवहन खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने आंदोलनानंतरही प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
एसटी प्रवाशांची सोय व्हावी तसेच एसटी स्थानकाचे स्थलांतर पुणे -मुंबई महामार्गावर वाकडेवाडी जवळ झाल्याने तेथील वाहतुकीची समस्या बिकट झाली होती, ती समस्याही सुटावी, अशा दुहेरी हेतूने काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला होता. अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.