शिवसेना की राष्ट्रवादी? कुठे जाणार रुपाली पाटील?
: मनसेला खिंडार वगैरे काही पडलेले नाही : वसंत मोरे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली देखील रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रुपाली पाटील यांच्या या विधानावर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली पाटील यांच्या जाण्यानं मनसेला खिंडार वगैरे पडलेलं नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री-प्लॅन आहे. तसेच रुपाली पाटील यांनी रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असं, आव्हानही वसंत मोरे यांनी दिले आहे.
रुपाली ठोंबरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS