Sasoon Hospital Pune | ससून मधील कर्करोग रुग्णालयासाठी सुधारीत प्रस्ताव | वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
Sasoon Pune – (The Karbhari News Service) – ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही आयुक्त स्तरावर सुरू असून, कर्करोग रुग्णालयाचा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली. (Pune News)
माधुरी मिसाळ,भिमराव तापकीर, सुनिल टिंगरे, राहूल कुल, सुनिल कांबळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मुश्रीफ उत्तर देत होते.
मुश्रीफ म्हणाले, “स्वतंत्र कर्करोग रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नव्हती. आता एमएसआरटीसीने रुग्णालयासाठी जागा देण्याचे मान्य केले आहे. तथापि, सध्या ससून रुग्णालयात कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.”
मिसाळ म्हणाल्या, “ससून मध्ये चांगले उपचार होत होते. आता गरीब लोकांच्या ओपीडीमध्ये रांगा लागतात, औषधे बाहेरून आणावी लागतात. स्कॅनिंग मशीन बंद असते. खरेदी केलेले स्ट्रेचर वापराविना बंद आहेत. ससून मध्ये खाजगी डॉक्टर उपचार करण्यासाठी येत होते. परंतु अमली पदार्थाचे सेवन, तुरुंगातील कैद्यांचे उपचार केंद्र अशी ससूनची प्रतिमा झाल्याने, हे डॉक्टर येत नाहीत. लिव्हर ट्रान्सप्लांट करणारे ससून हे पहिले शासकीय रुग्णालय होते. परंतु 2018 नंतर या ठिकाणी लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या नाहीत.”
यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, “ससूनच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपण स्वतः लोकप्रतिनिधींसह या रुग्णालयाला भेट देणार आहोत. औषध खरेदीचे अधिकार रुग्णालय अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. औषध बाहेरून आणावे लागेल अशी तक्रार आल्यास संबंधितांना जबाबदार धरून बडतर्फ करू.”