Sanvidhan Rakshak Purskar | ऍड. रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे व प्रशांत धुमाळ यांना सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘संविधान रक्षक’ पुरस्कार जाहीर
Sonia Gandhi Birthday – (The Karbhari News Service) – अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (Mohan Joshi Pune congress)
भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकार भवन येथे होणाऱ्या ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर व ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, तर अध्यक्षस्थानी मोहन जोशी असतील. यावेळी उपस्थित सर्वांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले जाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक प्रथमेश आबनावे यांनी दिली.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “संविधानावर विविध प्रकारे आघात होत असताना समाजातील अनेक सुजाण लोक संविधान रक्षणाचे काम करीत आहेत. मोहन जोशी यांच्या संकल्पनेतून अशा व्यक्तींना दरवर्षी सन्मानित केले जाते. ऍड. रमा सरोदे या कायदे अभ्यासक म्हणून संविधान रक्षणाचे, तसेच मानवाधिकार जपण्याचे काम करीत आहेत. आजवर त्यांनी मानवाधिकाराच्या अनेक प्रकरणामध्ये यशस्वी लढा दिलेला आहे. विठ्ठल गायकवाड भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्या माध्यमातून गेली १० वर्षे कार्यरत आहेत. ‘घर तिथे संविधान’ उपक्रमातून भारतीय संविधान घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. १० हजार संविधानाच्या प्रती मोफत वाटप, संविधानाचा जागर करणारे कार्यक्रम त्यांनी आयोजिले आहेत. गरीब परिस्थितीतून उच्च शिक्षण घेत कुटुंबाला व समाजाला सावरणाऱ्या मिलिंद अहिरे यांनी उद्योजक म्हणून, तसेच सामाजिक चळवळीत योगदान दिले आहे. बहुजन व आंबेडकरी चळवळीत योगदान देतानाच संविधान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागृती केली आहे. बहुजन महापुरुषांचे पुरोगामी विचारांसाठी असलेले योगदान जनमानसात पोहोचवण्याचे काम प्रशांत धुमाळ करीत आहेत. समविचारी व्यक्तींना प्रोत्साहन देऊन सामाजिक चळवळीत सक्रिय करण्याचे व राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक मदत देण्याचे काम त्यांनी केले आहे.”

COMMENTS