क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक
: एसआयटीमार्फत चौकशीची मागणी
मुंबई- मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात फरार किरण गोसावी, आर्यन खान आणि कथित सॅम डिसोजा दिसून येत आहेत. या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपावाल्यांनी जरुर याची सीबीआय चौकशी करावी. सीबीआय काय तुमच्या खिशात आहे का? तुम्हीही अनेक व्हिडिओ बाहेर आणले. पण आज तुमच्या काळजावर वार झाला म्हणून चौकशीची मागणी करताय का?, असा सवाल उपस्थित केला. तसंच मंत्री नवाब मलिक यांनी तर फक्त इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हलनंतरची खरी स्टोरी मी सांगणार आहे. येत्या काही दिवसांत असे १० व्हिडिओ मी देणार आहे. यात भाजपाचे लोक कुठे-कुठे बसलेत ते सगळं समोर आणणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
संजय राऊत आता कोणते व्हिडिओ समोर आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एनसीबीच्या धाडसत्रात पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. “एनसीबीचं धाडसत्रं हे षडयंत्र आहे. पैशाचा खेळ आणि मनी लाँड्रिंग यात झालीय. त्यामुळे ईडीनं याची चौकशी करावी असं मी आता सांगणार आहे. मी ट्विट केलेल्या व्हिडिओत आत एनसीबीच्या कार्यालयात बसलेल्या त्या व्यक्ती कोण आहेत? आता हा खेळ सुरू झाला आहे. व्हिडिओत काळ्या कपड्यांमध्ये बसलेला व्यक्ती सॅम डिसोजा असून मनी लाँड्रिंग प्रकरणातील तो एक मोठा मोहरा आहे. अनेक मोठे अधिकारी, नेते यांचा पैसा परदेशात पाठवण्यात त्याचा हात आहे”, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
प्रभाकर साईल याच्या धाडसाचं कौतुक
एनसीबीच्या कारवाईच्या षडयंत्राबाबत मोठा धाडसानं खुलासा केलेल्या प्रभाकर साईल याच्या हिमतीची दाद द्यायला हवी, असंही संजय राऊत म्हणाले. “प्रभाकर साईल या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याचा केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न नक्की होईल. पण त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईतच नव्हे थेट दिल्लीपर्यंत आहेत. या मुलानं मोठं धाडस केलं. त्यानं देशावर उपकार केले आहेत. त्याच्या धाडसाचं मी कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी समोर येतील. नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आता त्यापुढचा स्क्रिनप्ले मी सांगणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले. देशभक्तीचा मुखवटा पांघरुन काय आणि कसे व्यवहार केले जात आहेत यांचा सगळा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.
COMMENTS