RPI Pune| आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठोपाठ फरजाना आयुब शेख यांचाही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
| डॉ. धेंडे यांच्या महायुतीबाबतच्या भूमिकेला शेख यांचे समर्थन
Pune News – (The Karbhari News Service) – महायुतीमध्ये सहभागी असलेल्या आरपीआयमधील पदाधिकाऱ्यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे आरपीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देणे पसंत केले आहे. मंगळवारी (दि. २८) माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे हे सत्र अद्यापही सुरूच आहे. डॉ. धेंडे यांच्या पाठोपाठ आरपीआयच्या पुणे महापालिकेतील माजी गटनेत्या फरजाना आय्युब शेख यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. (Pune Politics)
देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील आरपीआयला एकही जागा सोडली नाही. सध्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीतही पक्षाला जागा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. आरपीआयला एससी, एसटी, ओबीसीसह अनेक समाजातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. या मतांचा गठ्ठा केवळ निवडणुकीत वापरायचा आणि नंतर सन्मानाची वागणूक द्यायची नाही, अशी भूमिका महायुतीची आहे. पक्षाला सन्मानपुर्वक वागणूक मिळत नसल्याने पक्षातील पुण्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबेडकरी अनुयायी नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचाच दाखला देत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपली नाराजी दर्शवत राजीनाम्याचे हत्यार उपासले. त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे राजीनामा पाठविला.
फरजाना आय्युब शेख यांनीही डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. २०१७ मध्ये पुणे महापालिकेत आरपीआयच्या माध्यमातून नगरसेविका म्हणून निवड झाली आहे. डॉ. धेंडे यांच्यासोबत राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत मी देखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे.
पक्षाला सन्मानपुर्ण वागणूक देऊन काही जागा महायुतीमध्ये ठेवणे अपेक्षित होते. ते झाले नाही. यामुळे पक्षाचा कार्यकर्ता दुखावले आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्या भूमिकेला माझेही समर्थन आहे. महायुतीकडून पक्षाला मिळणारी वागणूक पाहता मी देखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
– फरजाना आय्युब शेख, माजी गटनेत्या, आरपीआय. पुणे महापालिका.
COMMENTS