कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत
: स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
: नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश
पुणे- पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत जाहीर केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमार्फत पुणे शहरातील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी. तसेच सदर मयत नागरिकांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांचे नांव हस्तांतरण करतेवेळी आकारण्यात येणारी “वारसा फी” माफ करण्यात यावी. अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली.
सन २०२० पासून भारतात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले आहे. यास पुणे शहर देखील अपवाद नाही. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुणे शहरामध्ये सापडल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अशा वेळी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवून ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये पुणे शहरातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड्स राखीव ठेवणे, सर्व खाजगी रुग्रालयांबरोबर करार करून जास्तीत जास्त बेड्स ह्या करोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध ठेवणेबाबत सूचना देणे अशा अनेक उपाययोजनांचा समावेश होता.
परंतु कोरोनाची हि लहर इतकी घातक होती की यामध्ये अनेक नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक पाल्यांनी आपले दोन्ही पालक गमावले. त्यामुळे त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न उभा झालेला आपण सर्वांनी पहिला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली.
स्थायी समितीने मी केलेल्या मागणीला मान्यता दिल्यामुळे मी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचे आभार मानते. कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात सवलत 100 टक्के दिल्याने याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल.
अर्चना तुषार पाटील
नगरसेविका, स्थायी समिती सदस्य
COMMENTS