पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा | खासदार सुप्रिया सुळे
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे.
कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेबल्स सोसायटीच्या गेटसमोर थांबत होत्या. त्यांच्यासाठी जुनी डीएसके टोयोटा शोरूम हा अधिकृत थांबा होता. तो थांबा अचानक बंद करण्यात आल्यामुळे येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून तो थांबा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळकडे जाणाऱ्या अनुक्रमे ४३, ४४ आणि २२८ या क्रमांकाच्या पीएमपीएमएलच्या बससाठी या थांब्यावर अनेक प्रवासी बसची वाट पहात थांबलेले असतात. अचानक तो बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मागील किंवा पुढील बस थांब्यापर्यंत चालत जावे लागत आहे. ऐन कामाच्या वेळी हे चालत जाणे वेळखाऊ होते परिणामी कामावर किंवा शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होणे आदी गोष्टींमुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
हा थांबा पुर्ववत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही त्याची योग्य दखल घेतली जात नाही. येथे स्टॉपचा बोर्ड लावण्यात आला नाही. नागरीकांना बससाठी किमान एक किलोमीटर अंतर चालून पुढच्या स्टॉपपर्यंत जावं लागतं. हा मार्ग आणि बस बाणेर, निगडी, चिंचवड आणि हिंजवडी येथे जाणारे प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयोगी आहे.
नागरीकांची सोय लक्षात घेता वरील ठिकाणी सदर गाड्यांचा थांबा पुर्ववत करावा, असे सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
बावधन बु. येथील पेबल्स को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गेटसमोरील जुन्या डीएसके टोयोटा शोरुम बस स्टॉपवरील ४३, ४४ आणि २२८ या क्रमांकाच्या पीएमपीएमएलच्या बसचा थांबा बंद करण्यात आला आहे. हा थांबा पुर्ववत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही त्याची योग्य दखल घेतली जात नाही.
— Supriya Sule (@supriya_sule) March 9, 2023