Ravindra Binwade IAS | नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी – नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे
Pune News – (The Karbhari News Service) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी प्रदान करण्याबाबत महसूल व वन विभागाचा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, सुधारित आकृतीबंधानुसार सद्यस्थितीत मंजूर पदांची संख्या 3 हजार 952 झालेली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे. (Marathi News)
राज्याचे मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी) यांचे प्रयत्नाने विभागाच्या सध्या मंजूर 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे निरसित करण्यात आली तसेच त्यामध्ये 965 पदे नव्याने निर्माण करुन एकूण 3 हजार 952 पदांच्या सुधारित आकृतीबंधास महसूल व वन विभागाच्या 4 डिसेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल प्राप्त करुन देणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा विभाग आहे. विभागाची नवीन आकृतीबंधाची मागणी सन 2016 पासून प्रलंबित होती. विभागातील नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांच्या निर्मिती, दस्त संख्येत वाढ तसेच इतर कामकाजामध्ये झालेली व्यापक वाढ लक्षात घेता, या शासन निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम व बळकट होईल. पर्याप्त मनुष्यबळामुळे शासनाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या इष्टांक पूर्तीसाठी मदत होऊन शासन महसूलात वाढ होईल व पर्यायाने नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा शासनाचा व विभागाचा मानस सफल होण्यास यामुळे मदत होणार आहे, असेही बिनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

COMMENTS