Pune Water Turbidity | PMC Water Supply Department | पाण्याच्या गढूळतेमध्ये लक्षणीय वाढ | मनपा मार्फत पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी गाळून उकळून पिण्याचे आवाहन
Pune Rain News – (The Karbhari News Service) – 25 जुलै रोजी मध्यरात्री पासून पुणे धरण व इतर परिसरात झालेल्या अनन्यसाधारण पर्जन्यवृष्टीमुळे शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याच्या गढूळतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवसांसाठी मनपा मार्फत पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी गाळून उकळून पिण्यासाठी वापरावे. (Pune Municipal Corporation – PMC)
सर्वसाधारणपणे, पुणे मनपा कडील नवीन जलकेंद्रांची प्रकल्पिय क्षमता धरणांमधून येणाऱ्या पाण्याच्या 150 NTU (नेफेलो टरबीडीटी युनिट) इतक्या गढूळता निवारण्यासाठी असून जुनी जलकेंद्र 40NTU पर्यंतचे पाणी हाताळू शकतात. धरण क्षेत्रात अचानकपणे झालेल्या पावसामुळे व पाण्याच्या विसर्गामुळे शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याच्या गढूळतेमध्ये दिनांक 26 जुलै 2024 रोजी 6NTU, 22NTU, 98 NTU पासून 300NTU इतपत वाढ झाल्याचे व दिनांक 27जुलै 2024 रोजी शुद्धीकरणासाठी येणाऱ्या पाण्याची गढूळता 202NTU ते 223NTU पर्यन्त स्थिरवल्याचे आढळत आहे. सदर गढूळता ही नवीन जलकेंद्रांच्या प्रकल्पिय क्षमतेपेक्षा जास्त असूनही नवीन प्रकल्पांमधून शुद्ध झालेल्या पाण्याची गढूळता 5NTU पेक्षा कमी या आवश्यक मानकाप्रमाणे आहे तसेच इतर जुन्या जलकेंद्राच्या क्षमतेच्या पेक्षा खूपच जास्त प्रमाणात असलेली गढूळता लक्षात घेता अश्या जलकेंद्रातून 5NTU ते 13NTU दरम्यानच्या गढूळतेचे पाणी वितरित होत आहे. सर्व जलकेंद्रातून वितरित होणाऱ्या पाण्याचे 100% निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवसांसाठी मनपा मार्फत पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी गाळून उकळून पिण्यासाठी वापरावे.
पुणे महानगपालिका आरोग्य कार्यालय साथरोग विभाग चे नागरिकांसाठी जाहीर आवाहन
पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (PMC Health Department)
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी :
– पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा.
– न वापरातील विहीरींचे पाणी पिण्याकरिता वापरू नये.
– उघड्यावरचे अन्न, शिळे अन्न सेवन करू नये.
– पिण्याचे पाणी उकळुन व गार करून झाकून ठेवावे.
– शौचाहून आल्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे.
– अतिसार, पातळ संडास, थंडी, ताप इ. आल्यास आशा, नर्सताई, आरोग्य सेवकाकडून त्वरीत उपचार करून घ्यावा. तसेच पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा.
– पातळ संडास, अतिसारमधे जलशुष्कतेसाठी ओआरएस तथा जल संजीवनीचा (साखर मीठ पाणी) वापर करावा.
– उघड्यावर शौचास बसु नये. शौचालयाचाच वापर करण्यात यावा.
– हगवन, अतिसाराची, काविळची साथ असल्यास पिण्याचे पाण्यात क्लोरीन लिक्विड टाकुनच प्यावे.
– नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी . नळ गळती, व्हॉल्व लीकेज असेल तर दुरुस्त करून टाकी सभोवतालचा परीसर स्वच्छ ठेवावा.
– साठवणुकीचे पाणी झाकून ठेवावे, पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साठवू नये.
– आठवड्यातील एक कोरडा दिवस पाळावा. पिण्याच्या पाण्याची भांडी आठवड्यातुन एकदा रिकामी करून धुवून पुसून कोरडी करून ठेवावी. डासांच्या अळया पाण्यामधे होवू देऊ नये.
– साथीचे आजार बळावल्यास सर्वप्रथम आशा, आरोग्य सेवक/सेविका पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांना त्वरित कळविण्यात यावे.