सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट
|अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
– पदपथ, रंगीत दिशादर्शक फलकांनी समतानगर, लुम्बिनी चौकाचे सुशोभीकरण
वाहतुकी बाबत जनजागृती करण्यासाठी सुरक्षित वाहतूक झोन अंतर्गत अर्बन ९५ संस्था, पुणे महापालिकेमार्फत प्रभाग दोन स्मार्ट करण्यात आला आहे. या प्रभागातील समतानगर लुंबिनी, जेष्ठ नागरिक चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करून त्याचे उद्घाटन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Municipal corporation)
या कार्यक्रमाला अर्बन ९५ संस्थेचे प्रकाश पॉल, संदीप दीक्षित, आमिर पटेल, बाळासाहेब कांबळे आदींसह त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच प्रभाग दोन परिसरातील बालवाडी ( नर्सरी) चे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ व चैतन्य हास्य योगचे नागरिक तसेच परिसरा मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (Urban 95 organization)
वाढते शहरीकरण व वाहतुक समस्यामुळे चौकात लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व आजारी रुग्ण यांना जीव मुठीत घेउन रस्ता व चौक पार करावा लागतो. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन लहान बालकांना ‘सुरक्षित वाहतुक झोन ही योजना राबविली आहे. पुणे मनपा, अर्बन ९५’ या संस्थेच्या वतीने प्रभाग २ स्मार्ट करण्यात आला आहे. प्रभाग दोन मधील समतानगर, लुम्बिनी या चौकात ५०० मिटर परिसरामधे चार उद्यान, तीन विद्यालय, मनपाचा शिवराय दवाखाना, आधार कार्ड सेंटर, जेष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, बस स्टॉप, भाजी मंडई, बँक तसेच ६ बालवाडी आहेत. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुले, महिला, दिव्यांग नागरिक व जेष्ठ नागरिकांची या चौकात मोठी वर्दळ असते. वाहने देखील वेगाने ये जा करतात. परिणामी अपघाताच्या शक्यता टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी योग्य खबरदारी घेत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्दळीच्या या चौकात नागरिक, लहान बालके, महिला, वयोवृद्ध यांचे चालणे सुरक्षित झाले असल्याचे, डॉ. धेंडे यांनी सांगितले. (PMC Pune)
पुणे वाहतुक अतिरिक्त पोलिस आयुक्त मुल्ला सय्यद म्हणाले की, नागरिकांना वाहतूक शिस्त लागणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करायला पाहिजे. बालवाडीपासूनच मुलांना वाहतूक शिस्त, नियम या बाबत माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते या बाबत सतर्क होतील आणि वाहतूक शिस्त पाळणारे जबाबदार नागरिक देखील तयार होतील असे सय्यद म्हणाले.
चौकात या सुविधा असणार –
हा चौक बालस्नेही चौक म्हणुन विकसित करावा, यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रभागामधील सर्व नागरिकांच्या सहभागाने हा चौक विकसित करण्यात आला. यामध्ये पदपथ, रंगीत वाहतुक दिशादर्शक फलक, वाहतुकीचे माहिती फलक, लहान मुलांना बसण्याची व्यवस्था, नागरिकांना चालण्यासाठी पर्यायी मार्ग, रिक्षा व बस स्टैंडला राखीव जागा असे अनेक उपाय करण्यात आले आहेत.