Pune PMC News | समाज विकास विभागाच्या योजनांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता
महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय महिला बाल कल्याण समितीने केला मान्य
PMC SDD – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला महिला व बाल कल्याण समितीने मान्यता दिली आहे. (PMC Women and Child Welfare Committee)
महिला व बाल कल्याण समितीसमोर नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
सध्या काय आहे अट?
महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत महिलांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, अर्थसहाय्य, बचत गट प्रशिक्षण यासारख्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असावे अशी अट आहे.
मात्र सध्याच्या महागाईच्या काळात 1 लाख वार्षिक उत्पन्न म्हणजे दरमहा केवळ 8 हजार 333 रुपये होते. त्यामुळे अनेक पात्र कुटुंबांना या योजनांचा लाभ मिळत नव्हता, अशी मांडणी प्रस्तावात करण्यात आली होती.
प्रशासनाचा अभिप्राय काय?
महापालिका प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2.50 लाख रुपये आहे. त्याच धर्तीवर समाज विकास विभागाच्या योजनांसाठीही उत्पन्न मर्यादा 1 लाखावरून 2.50 लाख रुपये करावी.
कामगार कल्याण विभागाच्या मानधनाचा दाखला देताना प्रशासनाने म्हटले आहे की, अकुशल कामगाराला सध्या दरमहा 20 हजार 985 रुपये मानधन मिळते. त्याचे वार्षिक उत्पन्न 2.51 लाख रुपये होते. त्यामुळे 1 लाखाची मर्यादा कमी असल्याने अनेक नागरिक योजना लाभापासून वंचित राहत आहेत.
महिला व बाल कल्याण समितीने हा प्रस्ताव मंजूर केला असून आता अंतिम मान्यतेसाठी तो स्थायी समिती मार्फत मुख्य सभेकडे जाणार आहे. उत्पन्न मर्यादा 1 लाखावरून 2.50 लाख रुपये झाल्यास अधिकाधिक महिला आणि कुटुंबांना समाज विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
या निर्णयामुळे पुणे शहरातील गरजू महिलांना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार आणि इतर आर्थिक सहाय्य योजना मिळवणे सुलभ होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS