Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
Pune PMC Disaster Management – (The Karbhari News Service) – मान्सून (Monsoon) काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग (PMC Disaster Management Department) सज्ज झाला आहे. विभागाकडून SOP तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय विभागाने महापालिकेच्या 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना आपत्ती विषयक प्रशिक्षण देखील दिले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Ganesh Sonune PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोबत बैठका सुरु
सोनुने यांनी सांगितले कि, पुणे शहरात पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवते. कारण शहराच्या मध्यातून मुळा आणि मुठा नद्या वाहतात. तसेच शहरा पासून जवळच खडकवासला प्रकल्पातील धरणांची साखळी आहे. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असते. त्यानुसार महापालिका या कामासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोबत देखील महापालिकेच्या बैठका सुरु आहेत. त्यात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या होत्या कि, शहरातील सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. त्यानुसार महापालिका सर्व विभागांशी समन्वय ठेऊन आहे.
| पुणे मेट्रोला महापालिकेकडून सूचना
दरम्यान पुणे मेट्रो कडून शहरात विविध ठिकाणी कामे चालू आहेत. ही कामे काही ठिकाणी नदी पात्रात सुरु आहेत. तर काही ठिकाणी मेट्रोचे पिलर पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा ठरतात. याबाबत सोनुने यांनी सांगितले कि, मेट्रो च्या अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन आम्ही त्यांना या गोष्टींची सूचना देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मेट्रो ने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
डिसेंबर ते मार्च कालावधीत 2000 कर्मचाऱ्याना प्रशिक्षण
गणेश सोनुने यांनी सांगितले कि, पुणे शहरात तीन प्रकाराच्या आपत्ती प्रामुख्याने भेडसावतात. यामध्ये पूर, रस्ते अपघात आणि आग यांचा समवेश आहे. त्यामुळे या समस्यांचे निवारण करण्याबाबत महापालिकेच्या 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना डिसेंबर ते मार्च या कालावधीत आपत्ती विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात नागरी सुरक्षा दलाने सहकार्य केले. यात प्रामुख्याने शहरात आपत्ती आली तर तिचे निवारण कसे करावे, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन कसे हाताळावे, आपत्ती आल्यावर काय करावे आणि काय करू नये, सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
| SOP चे काम अंतिम टप्प्यात
गणेश सोनुने यांनी पुढे सांगितले कि, आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्व सूचना लक्षात घेऊन एक मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure (SOP) तयार करण्याचे काम सुरु आहे. Sop तयार झाल्यांनतर संबंधित सर्व विभाग महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ही नियमावली देण्यात येईल. त्यानुसार अंमल करण्याच्या सूचना दिल्या जातील.
—