Pune Metro News | मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण : मेट्रो धावली मुठा नदीखालून
Pune Metro News | आज पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी पूर्ण केली. आज मेट्रोने सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु केली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक पार करून मेट्रो ट्रेन ११ वा. ५९ मिनिटांनी स्वारगेट भूमिगत स्थानक येथे पोहचली (सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक अंतर ८५३ मी, बुधवार पेठ स्थानक ते मंडई स्थानक अंतर १ किमी आणि मंडई स्थानक ते स्वारगेट स्थानक अंतर १.४८ किमी). या चाचणीसाठी १ तास वेळ लागला. या चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी ७.५ किमी इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टनुसार पार पडली. एकूण 3.64 किमी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro Route)
सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या चाचणी मार्गावरील सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणे हि पुणे शहरात होणारी ऐतिहासिक घटना आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ३३.१ मी खोल, बुधवार पेठ स्थानक ३० मी खोल, मंडई स्थानक २६ मी खोल आणि स्वारगेट स्थानक २९ मी खोल आहे.
आजच्या चाचणीमुळे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. हा मार्ग सुरु झाल्यानंतर पुणे शहरातील मध्यवर्ती भाग मेट्रो नेटवर्कला जोडला जाणार आहे आणि जलद व सुरक्षित असा शहरी वाहतुकीचा पर्याय या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच रुबी हॉल क्लीनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या उन्नत मार्गावरील केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी व चाचणी पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाश्यांसाठी सुरु होऊ शकेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फायदा होणार आहे.
पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम करण्यासाठी मुठा, मुळा आणि पवना या ३ टनेल बोरींग मशीनचा (TBM) वापर करण्यात आला होता. बुधवार पेठ स्थानक हा मध्य धरून मुठा व मुळा या TBM ने कृषी महाविद्यालयातून भुयार खाणण्यास सुरुवात केली, तर पवना व मुठा २ (मुठा चे पहिले भुयार खणून झाल्यावर त्याचा वापर पुन्हा करण्यात आला) या TBM ने स्वारगेट येथून भुयाराचे काम सुरु केले. पुणे मेट्रो प्रकल्पामधील भुयारी मार्गाचे खोदकाम काम दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरु करण्यात आले आणि एकूण १२ किमी भुयारी मार्गाचे खोदकाम काम ४ जून २०२२ रोजी पूर्ण झाले.
पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी) आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक (६ किमी) आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक (४.७५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पंतप्रधान यांचे हस्ते होऊन तो प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला.
आजमितीस पुणे मेट्रोचे ९८% काम पूर्ण झाले असून उर्वरित मार्गाची कामे जोमाने सुरु आहेत. काही महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाश्यांसाठी खुले करण्यात येतील. येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे. पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेट गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट बस स्थानक, मुकुंदनगर, कसाब पेठ, लक्ष्मी रस्ता, कमलानेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता, तुळशीबाग, सारसबाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, नेहरू स्टेडियम इ. ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “आजची सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक मार्गावरील चाचणी पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. हि मार्गिका भूमिगत असून मुठा नदीच्या खालून जात आहे. येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल. रुबी हॉल क्लीनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या उन्नत मार्गावरील केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात हा मार्ग प्रवाश्यांसाठी सुरु होऊ शकेल.”