Pune Metro Line 3 | हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रथम मेट्रो ट्रायल रन यशस्वी !
Pune Metro News – (The Karbhari News Service) – माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्यात आहे. त्याअनुषंगाने शुकवारी (दि.४) दुपारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिली चाचणी धाव घेण्यात आली. (Man – Hinjewadi – shivajinagar Metro)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.
या २३.३ कि.मी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. जे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी महत्वाचे ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डब्बे असून त्याची एकूण प्रवाशी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० कि.मी वेगाने धावणार आहे.
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचली आहे. या मेट्रो लाईन ३ चे काम विक्रमी वेळेत पुर्ण होत असल्याने निश्चितच पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

COMMENTS