Pune Grand Tour | ‘बजाज पुणे ग्रँड टूर’अंतर्गत पहिल्या टप्प्याचे २० जानेवारी रोजी आयोजन; एकूण अंतर ९१.८ किलोमीटर
| टी.सी.एस सर्कल, हिंजवडी येथून सुरुवात ते डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे समारोप
Bajaj Pune Grand Tour – (The Karbhari News Service) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक एकच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी येथून सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची प्रशासनाकडून सखोल पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जागतिक नकाशावर यावीत, त्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News)
स्पर्धा मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार असून काही कालावधीसाठी मार्ग बंदही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून स्पर्धा दुपारी १ वाजून ३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी फेज-३ येथून सुरू होईल. त्यानंतर माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास या टप्प्याचा समारोप होणार आहे.

COMMENTS