Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

HomeBreaking Newsपुणे

Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

गणेश मुळे Apr 16, 2024 2:59 PM

Pune Loksabha Election Voting | पुणे लोकसभा मतदार संघात २ हजार १८ मतदान केंद्रावर होणार मतदान
Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ
PM Modi Pune Tour | पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Pune Election 2024 – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून प्रभावी संवाद आणि समन्वय राखत निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी सांगितले. माध्यमांनी निवडणूक प्रक्रियेचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करुन मतदारांपर्यंत मतदान प्रक्रियेची माहिती पोहोचविण्यात सहकार्य करावे, असेही आवाहनही त्यांनी केले. (Pune Loksabha Election)

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापन समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाचे समन्वयक अधिकारी डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, निवडणूक सुरळितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यात आले असून पहिले प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा, महावितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, बँक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ तसेच ज्या ठिकाणी परीक्षा सूरू आहेत त्या महाविद्यालयातील कर्मचारी इत्यादींना अत्यावश्यक सेवा म्हणून निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येणार आहे.

डॉ. दिवसे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना निवडणुकीतील विविध घटकांची, प्रक्रियेची सांगोपांग माहिती दिली. त्यांनी मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच व्हीव्हीपॅट बाबत माहिती देऊन ईव्हीएम एकदम निर्दोष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे सांगितले. ईव्हीएमची तपासणी, पहिली सरमिसळ, मशीनचे स्कॅनिंग, दुसरी सरमिसळ करणे या बाबीमुळे कोणते यंत्र कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची आधी कल्पना नसते, असेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमवर ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका छापल्यामुळे अंध व्यक्तींची सोय झाल्याचे ते म्हणाले.

ईव्हीएम वापरासाठी तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धती, मतदान यंत्राबाबत करावयाची कार्यवाही याची माहिती दिली. तसेच मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच सरमिसळ किती स्तरावर होते, मतदान केंद्र पथक कधी निश्चित होते हे सांगून या सर्व बाबी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि मतदानाच्या दिवशी पक्षांचे मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व त्यांची स्वाक्षरी घेऊन होत असतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणारी वर्किंग मतदार यादी, मतदान कार्यावरील कर्मचाऱ्यांचे मतदान (ईडीसी) व पोस्टल बॅलट आदी माहिती दिली.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सेवेतील ४०० अधिकारी कर्मचाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचेही डॉ. दिवसे यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी आदींची भूमिका याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी आवश्यक तेथे वाहन व्यवस्था इत्यादी सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पर्दानशीन महिलांसाठी मतदार केंद्रात सुविधा देखील करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयातील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत लक्ष ठेवण्यात येत आहे, तसेच नागरिकांच्या तक्रारीवरदेखील तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.