Pune Dengue News | डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांना महापालिका आयुक्तांचे निर्देश
| रुग्णांची माहिती IHIP पोर्टलवर तातडीने नोंदवा!
| डेंग्यू रुग्णांवर वेळेत उपचार करण्याचे आदेश; जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
PMC Dengue Alert – The Karbhari News Service – शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन डेंग्यू रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच डेंग्यू आणि इतर आजारांच्या रुग्णांची माहिती निदानानंतर त्वरित IHIP पोर्टलवर नोंदवून अद्ययावत ठेवण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या. (Naval Kishore Ram IAS)
महापालिका आयुक्तांच्या दालनात सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी तसेच पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
| रुग्णांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचे आवाहन
डेंग्यूच्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक उपचार तातडीने सुरू करावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले. ताप आल्यामुळे उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनीही त्यानंतर आपल्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये आजाराच्या पुढील टप्प्यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना आवश्यक खबरदारी, वैद्यकीय सल्ला आणि उपचारांबाबत योग्य मार्गदर्शन करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
डेंग्यूबाबत जनजागृती करताना केवळ बाह्यरुग्ण विभागातच नव्हे, तर रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दाखल असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवा|
| डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी घ्या
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा, घरात आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी व साठवण पात्रे नियमित स्वच्छ ठेवावीत आणि डासांची उत्पत्ती होऊ शकणारी ठिकाणे नष्ट करावीत. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना देण्याच्या सूचनाही रुग्णालयांना करण्यात आल्या.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांशी योग्य संवाद साधून त्यांना आजाराची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.
| शहरी गरीब योजनेची माहिती देण्याचे निर्देश
डेंग्यू किंवा अन्य आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेची सविस्तर माहिती द्यावी. या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आयुक्तांनी केले.
| खासगी रुग्णालयांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन
बैठकीदरम्यान खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या मांडल्या. या समस्यांची दखल घेऊन संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात येतील आणि त्यावर लवकरात लवकर योग्य उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
दरम्यान, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेमार्फत धूरफवारणी, औषधफवारणी आणि विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी डेंग्यूबाबत घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये आणि ताप किंवा डेंग्यूची लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS