Pune Corporation Budget | ‘झिरो वेस्ट’ साठी सीबीजी प्रकल्प, बायोमायनिंग आणि स्मार्ट स्वच्छता सुविधांना गती | कात्रज प्राणीसंग्रहालयाचा विकास | देशातील पहिली वायू नियंत्रण यंत्रणा
PMC Budget 2026-27 – (The Karbhari News Service) – शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प, बायोमायनिंग, यांत्रिकी साफसफाई आणि स्मार्ट टॉयलेट्सच्या उभारणीद्वारे स्वच्छ व शाश्वत शहर उभारण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Standing Committee Chairman Shrinath Bhimale)
सेंद्रिय कचऱ्यापासून स्वच्छ इंधन निर्मितीसाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामुळे कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, कार्बन उत्सर्जनात घट आणि स्थानिक रोजगारनिर्मितीस चालना मिळणार आहे. तसेच अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होणार आहेत.
देवाची उरुळी येथे साठलेल्या जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यात येत असून, या योजनेचा चौथा टप्पा यावर्षी सुरू होणार आहे. उर्वरित १८ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे ४० एकर जागा पुनर्प्राप्त (रिक्लेम) करण्यात येणार आहे. या जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने भू-भराव टाकण्याचे नियोजन आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर वाढविण्यात आला असून, परिमंडळ क्रमांक १ ते ४ मधील बारा प्रमुख रस्त्यांवर मेकॅनिकल रोड स्वीपर कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच झाडणकामासाठी कंत्राटी सेवकांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
मांसकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी २५ मेट्रिक टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाद्वारे चिकन, मटण आणि अंड्याच्या कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे.
शहरातील स्वच्छता सुविधांच्या उन्नतीसाठी प्रत्येक परिमंडळात प्रवेशद्वारांवर स्मार्ट पब्लिक टॉयलेट उभारण्यात येणार असून, १५ स्मार्ट टॉयलेट प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. विद्यमान २०० सार्वजनिक स्वच्छतागृहांचे अद्ययावतीकरण केले जाणार असून, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
याशिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून स्थानिक पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया अधिक प्रभावी केली जाणार आहे. जैववैद्यकीय कचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी विद्यमान यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असून, त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल.
——-
क्रीडा नर्सरीपासून हायपोक्सिक प्रशिक्षणापर्यंत सुविधा
‘फिट पुणे, फिट इंडिया’ या संकल्पनेच्या अंतर्गत क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा नर्सरी, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, नेहरू स्टेडियम विकास आणि क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध उपक्रमांची घोषणा पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अंदाजपत्रकात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात आला आहे.
बालकांमध्ये लहानपणापासून क्रीडा कौशल्य विकसित व्हावे यासाठी हडपसरसह शहरातील विविध भागांमध्ये क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गुणवंत खेळाडू घडण्यास प्रोत्साहन मिळून शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा विकास करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण सुविधा आणि सरावासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यात येणार असून, मध्यवर्ती भागातील खेळाडूंना याचा मोठा लाभ होईल. तसेच गणेश कला क्रीडा रंगमंचही अद्ययावत करण्यात येणार आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये सुसज्ज व अद्ययावत क्रीडांगणे विकसित करण्यात येणार असून, युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा, प्रशिक्षणाच्या संधी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
तसेच अॅथलेटिक्स, मॅरेथॉन, सायकलिंग आणि पर्वतारोहण यांसारख्या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना अत्याधुनिक हायपोक्सिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, फिटनेस मॉनिटरिंग आणि परफॉर्मन्स अॅनालिसिसची सुविधा दिली जाणार आहे.
याशिवाय, महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून शहरातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन विविध भागांत क्रीडांगणे, बहुउद्देशीय क्रीडा संकुले, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक, क्रीडा साहित्य अनुदान, दत्तक योजना, नोकरीत आरक्षण, शालेय स्पर्धा, शिष्यवृत्ती आणि पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
—–
कात्रज प्राणीसंग्रहालयाचा विकास, ‘नमो गार्डन’ आणि मिरॅकल गार्डनची संकल्पना
शहरातील हरित क्षेत्रांचा विस्तार आणि नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात उद्यान आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांवर विशेष भर देण्यात आला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात “उद्याने – शहराचा श्वास” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचा आंतरराष्ट्रीय दर्जात विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. सध्या येथे १०४ वन्यजीव प्रजाती असून ती संख्या १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. जिराफ, झेब्रा, आफ्रिकन चित्ता, अनाकोंडा, बबून यांसारख्या विदेशी प्रजातींचा समावेश केला जाणार असून बर्ड पार्कमध्ये देशी-विदेशी पक्ष्यांच्या साठ प्रजातींचे संवर्धन केले जाईल. कालबाह्य झालेल्या सर्पोद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून संग्रहालयासाठी भव्य प्रवेशद्वार उभारण्याचेही नियोजन आहे.
शहरात सध्या २१६ उद्याने असून आणखी आठ उद्यानांची कामे सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो गार्डन’ संकल्पनेतून प्रेरणा घेत विविध राज्यांच्या संस्कृती, कला आणि जीवनशैलीचे दर्शन घडविणारी थीम आधारित उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. अर्बन ९५ संकल्पनेअंतर्गत लहान मुलांसाठी सुरक्षित आणि आकर्षक जागा निर्माण करण्यात येणार असून कोंढवा खुर्द येथे नेचर बेस्ड फॅमिली पार्क विकसित होत आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मिरॅकल गार्डन’ उभारण्यात येणार आहे. यामध्ये आकर्षक फुलांची रचना आणि थीम आधारित उद्यान संकल्पना साकारण्यात येणार आहे. तसेच जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात बोटॅनिकल गार्डन उभारून जैवविविधतेचे संवर्धन आणि नागरिकांना निसर्गानुभवाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम प्रकल्पातील प्रलंबित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक हरित, स्वच्छ आणि आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होणार असून कुटुंबांसाठी दर्जेदार विरंगुळा केंद्रे निर्माण होतील. प्राणीसंग्रहालय आणि मिरॅकल गार्डनमुळे पर्यटनाला चालना मिळेल, तर उद्यानांमधील सुविधा वाढल्याने नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
——
देशातील पहिली वायू नियंत्रण यंत्रणा, ‘लेक सिटी’ संकल्पना आणि ५० लाख वृक्षलागवड”
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात पर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यावर भर देण्यात आला आहे.
शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिली अत्याधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने मोजला जाऊन प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविता येणार आहेत.
पुण्याला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाषाण, मॉडेल कॉलनी आणि जांभुळवाडी येथील तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलाव परिसरात पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक जागांची निर्मिती केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मांगडेवाडी, कात्रज, धायरी आणि लोहगाव परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नदी संवर्धन महोत्सव, संवाद-परिषद, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी राज्य वन विभागाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यामध्ये संरक्षक भिंती, वृक्षारोपण, पाणीसाठा आणि सुरक्षाव्यवस्था यांचा समावेश असेल.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून एका वर्षात तब्बल ५० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ‘शहरी जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत वेताळ टेकडी, पाचगाव पर्वती, वारजे, गंगाधाम, हडपसर, धानोरी आदी भागांमध्ये पाणी साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
या सर्व उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक स्वच्छ हवा, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक जीवनमान मिळण्यास मदत होणार आहे. तलावांचे सुशोभीकरण आणि वृक्षलागवडीमुळे शहरातील तापमान नियंत्रणात राहून जैवविविधतेला चालना मिळेल, तर जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, पुणे शहर अधिक टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे.
——
सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना
शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसृष्टी, भारत मंडपम, हेरिटेज कॉरिडॉर आणि विविध स्मारकांच्या उभारणीद्वारे पुण्याची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी’ उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य प्रदर्शन उभारण्यात येणार आहे. तसेच लोहगाव येथे नवी दिल्लीच्या धर्तीवर ‘भारत मंडपम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन व प्रदर्शनांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहराच्या प्रवेशद्वारांवर छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून, प्रकाशयोजना, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक प्रतिकृतींच्या माध्यमातून शहराची ओळख अधोरेखित केली जाईल. पर्यटन वाढीसाठी सारसबाग ते पर्वती रोप-वे, सारसबागेत काचेचा पूल आणि ‘ऑर्बी’ या अत्याधुनिक हवाई अनुभव केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय, सांस्कृतिक आराखडा आणि आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पुणे प्रथम’ या ब्रँडिंगद्वारे शहराची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, बाणेर-बालेवाडी येथे ‘पुणे कला अकादमी’ची स्थापना आणि कोथरूड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कला, साहित्य आणि संस्कृतीला नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
इतिहास जतन करण्यासाठी भिडेवाडा येथे महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक, संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे स्मारक, तसेच सावरकर, तानाजी मालुसरे आणि उमाजी नाईक यांच्या स्मारकांचे जतन व विकास करण्यात येणार आहे.
मध्यवर्ती पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी ‘हेरिटेज कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार असून, शनिवारवाडा ते मंडईपर्यंतच्या वारसा स्थळांचे सुशोभीकरण व पादचारी मार्ग विकसित केले जाणार आहेत.
याशिवाय सिंहगड रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू असून, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. पुण्याला ‘पुस्तकांची राजधानी’ म्हणून विकसित करण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

COMMENTS