Pune Book Festival News| ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’तून ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चा जागर | न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत काढलेल्या ग्रंथदिंडीत पाच हजाराहून अधिक मुलांचा सहभाग
Pune Pustak Mahotsav News – (The Karbhari News Service) – भारत मातेसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, ढोल-ताशाचा गजर व टाळ-मृदुंगाच्या तालावर ‘वाचाल तर वाचाल’सारखे संदेश देणारे फलक व लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे हाती घेत अन् मायमराठीची विपुल ग्रंथसंपदा विराजमान असलेली पालखी खांद्यावर मिरवित पारंपरिक वेषभूषा केलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी पुण्यात ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढली.
‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या शुभारंभाच्या निमित्ताने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काढलेल्या या ग्रंथ दिंडीमध्ये पुणे परिसरातील शंभरहून अधिक महाविद्यालयातील पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य अशा ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी काढलेल्या या ग्रंथदिंडीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले, तसेच विविध साहित्यिक, समाजसुधारकांची माहिती देण्यात आली. विविध अभंग, कविता, साहित्यिकांची माहिती देणारे फलक, ‘श्यामची आई’, ‘कऱ्हेचे पाणी’ अशा लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे विद्यार्थ्यांनी हाती धरली होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, अभिनेते प्रवीण तरडे, डॉ. नितीन घोरपडे, संयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते. या प्रसंगी प्रवीण तरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
….
महामानवांना अभिवादन
‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’त संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताबाई, संत सोयराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, शांता शेळके, पद्मा गोळे अशा वंदनीय व्यक्तिमत्त्वाच्या नावे ग्रंथ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. विविध विद्यार्थ्यांनी महामानवांची वेषभूषा करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
COMMENTS