शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान नेता हरपला
: काँग्रेस कडून श्रद्धांजली
पुणे: काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे गुरूवारी दुपारी दु:खद निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
: 1979 ला नगरसेवक झाले
१९७९ साली रणपिसे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ पर्यंत पर्वती विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार झाले व तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. सध्या ते काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते होते. अतीशय मनमिळावू आणि अभ्यासू नेते म्हणून रणपिसे सर्व पक्षात परिचित होते. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ते ओळखले जात. पुण्यात काँग्रेसची राजकीय स्थिती अवघड होत असतानाही पक्षाच्या जून्या कार्यकर्त्यांची एक फळी त्यांनी नेटाने टिकवून ठेवली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत त्यांनी विविध पदावर तीन दशके काम केले. आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘शरद रणपिसे यांनी यांची राजकीय कारकिर्द येरवडा भागातून सुरू केली. पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून चांगले काम केले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य आणि गटनेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनेक अध्यक्षांबरोबर त्यांनी काम केले. पक्ष संघटनेचा त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना पक्ष संघटनेतील अनेक कार्यक्रमांमध्ये महत्वाची जबाबदारी दिली जात असे. त्यांच्या निधनामुळे शहर काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मोठे नुकसान झाले आहे आणि पक्षाने एक निष्ठावंत नेता गमवला आहे. मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘शरद रणपिसे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व पुणे शहरातील एक जुना अनुभवी नेता हरपला. त्यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर अतिशय चांगले संबंध होते. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न विचारले आणि कामही केले. त्यांच्या निधनामुळे पक्ष संघटनेत कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. माझे व त्यांची अतिशय चांगले संबंध होते.’’
उद्या सकाळी ९ ते ११ त्यांचा पार्थिव देह अत्यंदर्शनासाठी सी २, वृंदावन अपार्टमेंट, बोटक्लब रोड, पुणे येथे ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमी येथे त्यांचा अत्यंविधी होणार आहे. असे शहर काँग्रेस कडून सांगण्यात आले.
COMMENTS