आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी
: अधिकाऱ्यांना वाटून दिली कामे
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरु आहे. प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. ३० मे रोजी रंगीत तालिम होणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी आज गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान कुणी काय काम करायचे याची विभागणी देखील करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागात १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांच्या प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत. सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडामंच हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.
COMMENTS