९०० कोटीच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती द्या
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे: नदी प्रदूषणमुक्त न करता नदी सुधार प्रकल्प राबविण्याचा भारतीय जनता पक्षाचा आग्रह पुणेकरांचा कररूपी पैसा अक्षरशः पाण्यात घालणारा आहे, या प्रकल्पाला राज्य शासनाने स्थगिती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे नद्या प्रदूषित आहेत. शहरातील सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जायका प्रकल्प राबविण्याचे ठरविण्यात आले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निष्क्रीयतेमुळे जायका प्रकल्प रखडला. नद्यांमधील प्रदूषण अजूनही आहे, असे असताना बंडगार्डन ते संगमवाडी आणि बंडगार्डन ते मुंढवा येथे नदी सुधार प्रकल्प राबविण्याची घाई भाजपने चालविली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटनही झाले. या नदी सुधार प्रकल्पाबद्दल स्वयंसेवी संस्था, अनुभवी नेत्यांचे आक्षेप आहेत. या आक्षेपांना उत्तर न देता आणि जायका प्रकल्प गतीने पूर्ण न करता भाजप अट्टाहासाने काम करीत आहे, यात पुणेकरांचे नऊशे कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नदी सुधार प्रकल्पात लक्ष घालावे, व्यापक बैठक बोलावून प्रकल्पास स्थगिती द्यावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे. मुळा मुठा नदी सुधारणा करण्यास काँग्रेसचा विरोध नाही पण नदीचा प्रवाह प्रदूषणमुक्त न करता नदी सुधार प्रकल्प राबविल्याने पुणेकरांचा पैसा पाण्यात जाणार आहे आणि घाईघाईने प्रकल्प राबवून कामाचा देखावा भाजप करीत आहे आणि त्याला विरोध आहे, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS