PMPML Passes | पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून अनुदानित पासेसचे वितरण सुरू
PMP Bus Pass- (The Karbhari News Service) – पुणे मनपा शाळेतील इ. ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इ. ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMPML)
पासेससाठी अर्जांचे वाटप खालील आगारांमधून व सर्व पास केंद्रांवरून सुरू करण्यात आलेले आहे.
1) स्वारगेट २) न.ता.वाडी ३) कोथरूड ४) कात्रज ५) हडपसर ६) अप्पर ७) पुणे स्टेशन ८) बालेवाडी ९) भेकराईनगर १०) शेवाळेवाडी ११) बाणेर १२) वाघोली.
भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या वरील नमूद आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या वरील नमूद आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. तसेच सदरचे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पास रकमेच्या २५% रकमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल. ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून वरील नमूद आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेस करिताचे अर्ज वितरण १६/०६/२०२५ पासून महामंडळाच्या वरील नमूद आगारांमधून सुरू करण्यात आलेले आहे.
प्रस्तुत योजनेसंबंधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये उपलब्ध आहे. पुणे मनपाचे शाळेतील व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आलेले आहे.
अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४
COMMENTS