PMPML Income | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!
Pune PMP Ticket – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) उत्पन्न आणि सेवा गुणवत्ता वाढविण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी स्टार्टर, चेकर, तसेच वरिष्ठ वाहक व चालक सेवकांना बस स्थानकावरून बस मार्गस्थ होण्यापूर्वी प्रवाशांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आहेत. (PMPML Pune)
सीएमडी यांनी घेतली चेकर सेवकांची बैठक
वाहतूक विभागाशी संबंधित मुख्यालय क्र. १ व २ मधील चेकर सेवकांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी स्वारगेट येथील मुख्य प्रशिक्षण हॉल येथे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. बैठकीमध्ये प्रवाशांनी क्युआर कोड अथवा पीएमपीएमएल मोबाईल अॅपद्वारे तिकीट घेण्याची प्रक्रिया जलद व्हावी, यासाठी वाहक सेवकांनी बस सुटण्यापूर्वी ज्या प्रवाशांना क्युआर कोड अथवा आपली पीएमपीएमएल अॅप व्दारे तिकीट घ्यावयाचे आहे अशा प्रवाशांनी लगेच तिकीट घ्यावे अशा सुचना प्रवाशांना देणे आवश्यक राहील. तसेच नेटवर्क अडचणींमुळे प्रवाशांना तिकीट घेण्यास विलंब झाल्यास पुढील थांबा येण्यापूर्वी तत्काळ रोखीने तिकीट वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या कडून दंड वसूल करण्याचे आदेश
तसेच, चेकर सेवकांना मार्गावरील तिकीट तपासणीदरम्यान जर प्रवाशांनी नेटवर्क समस्येमुळे डिजिटल तिकीट न घेतल्याचे आढळल्यास, महामंडळाच्या विनातिकीट धोरणानुसार दंड वसूल करून त्याबाबतचा अहवाल संबंधित मुख्यालयास सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे पीएमपीएमएलच्या बस सेवेत डिजिटल तिकीट व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल, विनातिकीट प्रवासात घट येईल आणि महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS