PMC Warje Multispeciality Hospital | वारजेत उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन!
PMC Warje Multispeciality Hospital – (The Karbhari News Service) – वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन उद्या सकाळी (रविवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कै. अरविंद बारटक्के दवाखाना ,अतुल नगर, वारजे, पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
तसेच यावेळी इतर प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
– हे आहेत प्रकल्प
1. घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे (ROBII) लोकार्पण (ऑनलाईन पद्धतीने)
2. घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणा-या उड्डाणपुलाचे (ROBI) भूमिपूजन
3. वारजे येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण (ऑनलाईन पद्धतीने)
4. वारजे येथील स. नं. १३१ ते १३४ लगतच्या स.नं. मधून जाणाऱ्या २४ मी. डि पी रस्त्याचे भुमिपूजन (ऑनलाईन पद्धतीने)
यावेळी दिलीप वळसे-पाटील, सहकार मंत्री, चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद आणि सर्व खासदार व सर्व आमदार यांची उपस्थिती असणार आहे.
वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल चा प्रस्ताव काय आहे?
वारजे येथे महापालिकेच्या जागेवर डीबीएफओटी तत्वावर उभारण्यात येणार्या ३५० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलची उभारणी करण्याचा प्रस्ताव १७ फेब्रुवारी २०२३ रोजी स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. या हॉस्पीटलसाठी ठेकेदार ३६० रुपये कर्ज काढणार असून त्याचा विमाही काढणार आहे. २०२२ मध्ये लोकनियुक्त स्थायी समितीने वारजे येथील महापालिकेच्या जागेवर डीबीओएफटी तत्वावर ३५० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचा प्रस्ताव मंजुर केला. मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीचा कार्यकाळ संपत असताना भाजपच्या सदस्यांनी महापालिकेने डीबीएफओटी तत्वावर उभारण्यात येणार्या या हॉस्पीटलसाठी ठेकेदार कंपनी काढणार्या कर्जाला जामीनदार राहावे, अशी उपसूचना दिली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी मागविलेल्या निविदांमध्ये रुरल एनहांसर्स (Rural Enhancers ltd.) आणि मे.ए.सी.शेख कॉन्ट्रॅक्टर (M/s. A. C. Shaikh Contractor) या दोनच कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी रुरल एनहांसर्स या कंपनीचा प्रस्ताव अधिक फायदेशीर असल्याने या कंपनीला काम देण्याचा निर्णय १७ फेब्रुवारी २०२३ मध्ये स्थायी समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या कंपनीने १० टक्के फ्री बेड, ६ टक्के बेडस हे सी.जी.एच.एस. दरामध्ये उपलब्ध होणार आहेत, तर उर्वरीत ८४ टक्के बेडस् हे संबधित संस्था व्यावसायीक दराने वापरणार आहे. महापालिकेला दरवर्षी ९० लाख रुपये भाडे देणार आहे. ३० वर्षांसाठीच्या करारात दरवर्षी ३ टक्के दराने भाडेदरात वाढ करण्यात येणार आहे.
या कंपनीने महापालिकेच्या नावे परदेशातील कंपनीतून कर्ज काढायचे असून नेदरलँडमधील इन्शुरन्स कंपनी या कर्जाचा विमा उतरवणार आहे. कर्जाचे हप्ते संबधित संस्थेने भरायचे आहेत. तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका, संबधित संस्था, कर्ज पुरवठा करणारी बँक व इन्शुरन्स कंपनी असा त्रिसदस्यीय करार करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेवर कुठलेच आर्थिक दायित्व नसणार असल्याचे प्रस्तावामध्ये म्हंटले आहे.