PMC Safai Karmchari | महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दीड पट वेतन!
| कामगार कल्याण विभागाच्य प्रस्तावाला स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्य सणांच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांकडून काम करून घेतल्यास त्यांना आर्थिक मोबदला म्हणून त्या दिवसाचे दीडपट वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला आज स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या बैठकीत मान्यता दिली आहे. सफाई कामगारांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. (PMC Labour Welfare Department)
महापालिका प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिकेने विभागनिहाय सुट्ट्यांची संख्या निश्चित करून धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार पुणे मनपातील प्रशासकीय अधिकारी/कर्मचा-यांशिवाय अन्य कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्या जातात.
दरम्यान राज्य सफाई कर्मचारी आयोग यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये “शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांना किती वार्षिक सुट्ट्या दिल्या जातात, सफाई कर्मचान्यांना सर्व मान्य शासकीय सुट्ट्या देण्यात याव्या व दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात यावी, ती सुट्टी दिली जात नसेल तर त्याचे अतिरिक्त वेतन देण्यात यावे.” असे निर्देश अध्यक्ष यांनी दिले होते.
दरम्यान ज्या विभागांना ५ दिवसाचा आठवडा लागू होणार नाही त्या विभागांची माहिती शासन निर्णयात नमूद केली आहे. यामध्ये “सफाई कामगार” यांचाही समावेश आहे. त्यामुळे शासन निर्देश विचारात घेता सफाई कामगारांना ५ दिवसांच्या आठवड्याप्रमाणे शनिवारची सुट्टी लागू करता येत नाही.
पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांकडून सुट्टीच्या दिवशी काम करून घेतल्यास त्याचा आर्थिक मोबदला म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांला दिवसाचे दिडपट वेतन द्यावयाचे झाल्यास यासाठी वेतन खर्चामध्ये वार्षिक ३.५ ते ४ कोटी वाढ होणार असल्याने त्यासाठी मुख्य सभेचे मंजुरीने धोरण ठरवावे लागणार आहे. त्यानुसार कामगार कल्याण विभागाने हा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवला होता.
त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना दरवर्षी शासनाकडून अधिसूचित केल्या जाणाऱ्या शासकीय सुट्ट्यांपैकी सफाई कामगारांना पुर्वीपासून दिल्या जाणाऱ्या १२ दिवस सुट्ट्या वगळून इतर मान्य सणांच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांकडून काम करून घेतल्यास त्यांना आर्थिक मोबदला म्हणून सदर दिवसाचे दीडपट वेतन देण्याला धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. २०२५ मध्ये या शासकीय सुट्ट्या २४ इतक्या आहेत. त्यामुळे कामगारांना १२ सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे.
कामगार कल्याण विभागाने पुढाकार घेत हा प्रस्ताव ठेवला होता. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आता महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. सफाई कामगारांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे.
- नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे महापालिका.

COMMENTS