PMC Road Department | पथ विभागाची पॅकेज निविदा विशिष्ट ठेकेदारांसाठी! | माजी नगरसेवकांचा आरोप
PMC Tender – (The Karbhari News Service) – पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ साठी पुणे महापालिका पथ विभागाच्या वतीने पॅकेज निविदा काढण्यात आली आहे. मात्र सुधारित निविदा कार्यप्रणालीनुसार ₹२५ कोटी ते ₹१०० कोटी पर्यंतच्या कामांसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे. तथापि, सदर निविदेसाठी फक्त ७ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. इतका अल्प कालावधी ठेवण्याचे कारण काय आहे? यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक राहील का? निविदा अटी अशा प्रकारे घाईघाईने ठेवणे म्हणजे विशिष्ट ठेकेदारांसाठी जाणीवपूर्वक संधी निर्माण करण्याचा संशय निर्माण होतो. असा आरोप माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच निविदा रद्द करून सुधारित प्रक्रिया करण्याची मागणी महापलिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
माजी नगरसेवकांच्या निवेदन नुसार या कामाची मुदत फक्त २ महिने ठेवण्यात आली असून त्यातही १.५ महिना पावसाळ्याचा कालावधी आहे. पावसाळ्यात डांबरी व काँक्रिट रस्त्यांची कामे दर्जेदारपणे करणे शक्य आहे का? अशा वेळी केलेली कामे टिकतील का? असा प्रश्न उपस्थित करत मागील पॅकेजमधील ₹२५० कोटींच्या निविदेसारखेच दर्जाहीन व गैरप्रकार या निविदेतही होण्याची शक्यता आहे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, निविदेत कोण कोणते रस्ते समाविष्ट आहेत, याची संपूर्ण यादी सार्वजनिक करण्यात यावी. याच रस्त्यांवर मागील पॅकेजमध्ये कामे झाली होती का? जर झाली असतील, तर अजूनही दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period) लागू आहे. अशा परिस्थितीत नवीन निविदा काढण्याऐवजी मागील ठेकेदारासच दुरुस्ती करण्यास का भाग पाडले जात नाही?
दोषदायित्व कालावधीतील जबाबदारी न घेता नवीन खर्च करणे म्हणजे नागरिकांच्या कररकमेचा अपव्यय होय, असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, या अटींमुळे ठराविक तीन ते चार जणांच्याच निविदा आल्या आहेत. हे टेंडर मॅनेज झाल्यासारखे वाटते. या कामाबाबत एकंदर किती निविदा आल्या होत्या ते जाहीर करावे. यामध्ये मागील झाडण कामाच्या निविदेप्रमाणेच रिंग झाल्याचा संशय येतोय. या सर्व बाबींचे स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात यावे. अन्यथा ही निविदा रद्द करून सुधारित निविदा कार्यप्रणालीप्रमाणे योग्य कालावधी, पारदर्शक प्रक्रिया व दर्जेदार कामे सुनिश्चित करण्यात यावीत. अशी मागणी माजी नगरसेवकांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.

COMMENTS