PMC Property Tax | दुबार मालमत्ता कर नोंदी दुरुस्तीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल
| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
Pune Property Tax – The Karbhari News Service – पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणीतील दुबार-तिबार नोंदी, टंकलेखनातील चुका आणि प्रशासकीय त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४८५ अंतर्गत अशा नोंदी दुरुस्त करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC Standing Committee)
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे मालमत्तांच्या कर आकारणीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अनेक प्रकरणे येतात. जुनी मिळकत पाडून त्याच जागेवर नवीन इमारत उभारल्यानंतरही जुन्या मिळकतीची कर आकारणी सुरू राहते. काही ठिकाणी खुल्या भूखंडाची आणि त्यावर उभारलेल्या इमारतीची स्वतंत्र कर आकारणी कायम राहते. त्यामुळे एकाच मालमत्तेसाठी दुबार किंवा तिबार करदेयके तयार होतात. याशिवाय टंकलेखनातील चुका आणि प्रशासकीय त्रुटींमुळेही चुकीची कर आकारणी झाल्याची प्रकरणे समोर येतात.
अशा प्रकरणांमध्ये कर निर्लेखनाची प्रक्रिया राबविण्याऐवजी अभिलेख दुरुस्तीची कार्यपद्धती निश्चित करण्याची प्रशासनाची भूमिका होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १५२ नुसार कर निर्लेखनाची प्रक्रिया ही कायदेशीर प्रयत्न करूनही वसूल न होणाऱ्या कराच्या रकमेसाठी आहे. त्यासाठी नोटीस, जप्ती, लिलाव यांसारख्या उपाययोजना करूनही कर वसूल होत नसल्याची खात्री करावी लागते. मात्र, प्रशासकीय चुकीमुळे निर्माण झालेली दुबार करदेयके ही प्रत्यक्ष कर थकबाकी नसल्याने त्यांना निर्लेखनाची प्रक्रिया लागू करणे योग्य ठरणार नसल्याचे प्रशासनाने प्रस्तावात स्पष्ट केले होते.
त्यामुळे कलम ४८५ अंतर्गत मालमत्ता कराच्या अभिलेखांमधील लेखनदोष, चुकीच्या नोंदी आणि प्रशासकीय त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. यापूर्वीच्या अधिकारवाटपाच्या आदेशानुसार सक्षम अधिकाऱ्यांच्या स्तरावर अशा प्रकरणांचा निर्णय घेण्याचे प्रस्तावित होते.
मात्र, स्थायी समितीने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला आहे. त्यामुळे दुबार-तिबार मालमत्ता कर नोंदी दुरुस्त करण्यासाठी प्रस्तावित स्वतंत्र कार्यपद्धतीला मंजुरी मिळालेली नाही.
| दुबार कर आकारणीची प्रमुख कारणे
– जुनी मिळकत पाडल्यानंतरही तिची कर आकारणी सुरू राहणे.
– त्याच जागेवरील नवीन इमारतीची स्वतंत्र कर आकारणी होणे.
– खुल्या भूखंडाची आणि त्यावरील बांधकामाची दुबार नोंद राहणे.
– एकाच मालमत्तेची दुबार किंवा तिबार कर आकारणी होणे.
– टंकलेखनातील चुका आणि प्रशासकीय त्रुटींमुळे चुकीची करदेयके तयार होणे.

COMMENTS