PMC Retired Employees | पुणे महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक; ३१ डिसेंबरपर्यंत मुदत
Pune Retirement – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना हयातीचे दाखले तसेच पुनर्विवाह न केल्याचे दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यालयीन परिपत्रक जारी केले असून, संबंधित निवृत्तिवेतनधारकांनी २ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदींनुसार निवृत्तिवेतन आणि कुटुंब निवृत्तिवेतन अदा करण्यात येते. महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम क्रमांक ३३२ व ३३५ मधील तरतुदींनुसार निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी दरवर्षी एकदा हयातीचे दाखले किंवा प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तिवेतन किंवा कुटुंब निवृत्तिवेतन अदा करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेच्या सर्व निवृत्तिवेतनधारकांनी आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी आवश्यक दाखल्यांसह पुनर्विवाह न केल्याचे दाखलेही सादर करावेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
| दाखले सादर करण्यासाठी तीन पर्याय
निवृत्तिवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी महापालिकेने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
| प्रत्यक्ष उपस्थित राहून दाखले सादर करणे
निवृत्तिवेतनधारकांनी कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तिवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत किंवा निवृत्तिवेतन विभागामार्फत मुख्य लेखा व वित्त विभाग, पुणे महानगरपालिका येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक दाखले सादर करावेत.
| इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत डिजिटल दाखला
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ही सेवा घरपोच किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार-सक्षम बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या आधारे निवृत्तिवेतनधारकांना नाममात्र शुल्क भरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्राप्त करता येते. परिपत्रकानुसार यासाठी ७० रुपये शुल्क नमूद करण्यात आले आहे.
| PMC LIFE CERTIFICATE APP द्वारे सुविधा
पुणे महापालिकेच्या निवृत्तिवेतनधारकांना PMC LIFE CERTIFICATE APP द्वारे डिजिटल पद्धतीने हयातीचे दाखले सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधितांना या अॅपचा वापर करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
| मुदतीत दाखले न दिल्यास निवृत्तिवेतनावर परिणाम
निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत दाखले सादर न केल्यास त्यानंतरही दाखले सादर केल्यानंतरच निवृत्तिवेतन अदा करण्याची कार्यवाही केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेचे सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व संबंधित निवृत्तिवेतनधारकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विहित मुदतीत आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS