PMC Health Department | उष्माघाता पासून (Heat Stroke) स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबीयांचा बचाव करा | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

HomeपुणेBreaking News

PMC Health Department | उष्माघाता पासून (Heat Stroke) स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबीयांचा बचाव करा | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

गणेश मुळे Mar 21, 2024 3:02 AM

Senior Citizens Health | PMC Health Department | शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार पुणे महापालिका
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेतील डायलिसिसचे दर निश्चित नसल्याने महापालिका आणि रुग्णांचे नुकसान
Warje Multispeciality Hospital PMC | वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातील फाईल्स दाखवण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ!

PMC Health Department | उष्माघाता पासून (Heat Stroke) स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबीयांचा बचाव करा | पुणे महापालिका आरोग्य विभागाचे आवाहन

PMC Health Department – (The Karbhari News Service) – सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन ( जलशुष्कता ) मूळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Surykant Devkar PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

उष्माघात होण्याची कारणे :-

उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील
वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :-

मळमळ उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ.

अतिजोखमीच्या व्यक्ती:-

बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार इ.

प्रतिबंधात्मक उपाय :-

१. वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात असताना करावीत.
२. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे.
३. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.
४. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादी चा वापर करावा.
५. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा.
६. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका.
७. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्रा/ रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.

उपचार :-

१. रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
२. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.
३. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एयर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.
४. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये.
५. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात.
६. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
७. नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात, रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा.