PMC Election | प्रचारफेरी, सभा, मिरवणूक तसेच विविध परवानगी साठी एक खिडकी परवानगी कक्ष – ऑनलाईन प्रणाली!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. उमेदवार प्रचारफेरी / सभा / मिरवणूक याद्वारे प्रचार करणार आहेत. बोर्ड बेनर, फ्लेक्स, प्रचार वाहने प्रचारफेरी / सभा / मिरवणूक यासाठी पुणे महानगरपालिकेकडून निवडणूक कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नवल किशोर राम, महापालिका आयुक्त यांच्या हस्ते ” एक खिडकी परवानगी कक्ष ” सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या संगणक प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रचारफेरी / सभा मिरवणूक तसेच विविध परवानगी प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. यावेळी ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), प्रसाद काटकर, उप आयुक्त निवडणूक कार्यालय, रवि पवार, एक खिडकी परवानगी कक्ष प्रमुख, राहुल जगताप, सिस्टीम मॅनेजर माहिती व तंत्रज्ञान विभाग उपस्थित होते.
याप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे कार्यालय पुणे, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे, पोलीस प्रशासन परिवहन विभाग, सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका, सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे नोडल ऑफिसर, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नोडल ऑफिसर उपस्थित होते. यावेळी श्री रवि पवार यांनी एक खिडकी परवानगी कक्ष संगणक कार्यप्रणाली संदर्भात माहिती दिली. मा .महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी प्रत्येक विभागाची जबाबदारी, कर्तव्ये या विषयी मार्गदर्शन केले.
पुणे महानगरपालिके मार्फत प्रथमच ऑनलाईन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. परवानगी देण्यासाठी विलंब न होता कमीत कमी वेळेत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी प्रचारफेरी / सभा / मिरवणूक तसेच विविध परवानगी प्रमाणपत्र देणेकरीता नागरिकांसाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://electionpermits.pmc.gov.in/
या ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयात जोडण्यात आले असून, उमेदवाराने मागणी केलेल्या परवानगीनुसार आवश्यक असणारे फी शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क जमा केले नंतर आवश्यक असणारे प्रचारफेरी, सभा, मिरवणूक तसेच विविध परवानगीचे पत्र प्राप्त होणार आहे. तथापि प्रथम चलन सादर करणाऱ्या उमेदवारांस सभा स्थान परवानगी प्राधान्य देण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करण्याची वेळ स.९.४५ ते सा. ६.१५ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.
उमेदवार एकावेळी सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी या लिंकचा वापर करू शकतात. तसेच उमेदवारास परवानगी विषयक अद्ययावत माहिती मिळण्यास मदत होणार असून, या प्रणालीमुळे उमेदवारांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा नागरिकांना सोयीस्कर, पारदर्शक व कार्यक्षम सेवा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज प्रक्रियेत सुलभता मिळणार आहे.

COMMENTS