रक्षाबंधन दिवशी पीएमपी ला मिळाले कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न
पुणे – रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत पीएमपीने गुरुवारी १८१२ बस सोडल्या होत्या. यातून एका दिवसात सुमारे १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर यातून पीएमपीला सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. नेहमीच्या तुलनेत सुमारे तीन लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला तर यातून सुमारे चाळीस लाख जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.
रक्षाबंधनामुळे सकाळपासून पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पीएमपी प्रशासनाने गुरुवारी १८१२ बस रस्त्यांवर उतरविल्या. सकाळच्या सत्रात सुमारे ९० लाख रुपयांचे तर दुपारच्या सत्रांत ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा दरम्यान ही प्रवासी वाहतूक झाली.